मासेमारी बेतली मुलाच्या जीवावर  | पुढारी | पुढारी

मासेमारी बेतली मुलाच्या जीवावर  | पुढारी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या मुलाला आधीच तुटून पडलेल्या विद्युतभारित तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. विकास संजीव मोगेरा (वय 14, रा. नाथ पै नगर, अनगोळ) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. 

विकास व त्याचे काही मित्र मासेमारीसाठी सकाळी बाहेर पडले. सर्व मित्र अनगोळमधील काळा तलावाच्या सांडेवाटे पाणी बाहेर पडणार्‍या नाल्यात मासेमारी करत होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळच्या वेळी जोरदार वार्‍यासह पावसाची चळक आली होती.  यावेळी नाल्यावरून गेलेल्या वीज खांबावरील तार आधीच तुटून नाल्यात पडली होती. याचा विकासला  अंदाज आला नाही. त्याने नाल्यात पाय ठेवताच उच्च दाबाची तार तुटून पडल्याने त्याला जोराचा विजेचा धक्‍का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर इतर मित्रांचे लक्ष त्या तारेकडे गेले. ते धावतच माघारी आले व घडलेली घटना घरच्यांना सांगितली. तत्पूर्वी, येथे असलेल्या एकाने विकासला बाहेर काढण्याचा  प्रयत्न केला. परंतु, त्याला किरकोळ विजेचा धक्‍का बसल्याने तो माघारी सरकला. ही माहिती टिळकवाडी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक कारेमनी यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट दिली. वीज बंद करून सदरचा मृतदेह बाहेर काढला. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उपनिरीक्षक कारेमनी पुढील तपास करीत आहेत. 

 

Back to top button