मुख्यमंत्र्यांबाबत हायकमांड निर्णय घेईल | पुढारी | पुढारी

मुख्यमंत्र्यांबाबत हायकमांड निर्णय घेईल | पुढारी

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री बदलण्यात येणार आहे की नाही, याबाबत मला काहीही माहिती नाही. हा निर्णय हायकमांड घेणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांनी दिली.

राज्याचे भाजप प्रभारी अरुण सिंग यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ईश्‍वरप्पा म्हणाले, राज्याच्या भाजपमध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे. काही जणांनी मुख्यमंत्री बदलण्यात यावा अशी मागणी केली आहे, तर अनेक जण येडियुराप्पा हेच मुख्यमंत्रिपदी राहावेत, असे सांगितले आहे. काही जणांनी दिल्लीवारी केली आहे. त्यामुळे पक्षात काही प्रमाणात गोंधळ नक्की आहे. बसनगौडा यत्नाळ-पाटील, सी. पी. योगेश्‍वर यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांबाबत वरिष्ठांशी चर्चा करणे गरजेचे आहे. पक्षाच्या चौकटीत राहूनच आपली मते व्यक्त करण्यात यावीत, अशा सूचना आपण त्यांना केल्या आहेत.

रेणुकाचार्य यांनी मुख्यमंत्री बदलण्याबाबत कोणत्याही प्रकारची मोहीम राबविण्यात येत नसल्याचे सांगितले आहे. पक्षातील नेत्यांत बेदिली दिसून येत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय हायकमांड घेणार आहे. अरुण सिंग यांनी सर्व माहिती घेतली आहे, त्यामुळे आता हायकमांड काय निर्णय घेते, यावर सर्व अवलंबून असणार आहे, असेही ईश्‍वरप्पा यांनी सांगितले.

 

Back to top button