गोकुळची वर्षाला पाच कोटींची बचत | पुढारी

गोकुळची वर्षाला पाच कोटींची बचत

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गोकुळ दूध संघाचे महानंद, गोरेगाव या दुग्धशाळेत प्रति लिटर एक रुपये 55 पैसे या दराने पॅकिंग करून घेण्याचा करार मुंबईत गुरुवारी झाला. यामुळे गोकुळचे प्रति लिटर 19 पैसे बचत होऊन वार्षिक दोन कोटी आठ लाखांची बचत होणार आहे. तसेच अतिरिक्त रोजंदारी नोकर कपातीतून 3 कोटी 12 लाख रुपये वार्षिक बचत होणार आहे. या पॅकिंग कराराने महानंदला आर्थिक हातभार लागणार आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) मुंबईतील प्रतिदिन दूध विक्री 7 लाख लिटर आहे. संघाच्या वाशी येथील डेअरीमधून प्रतिदिन पाच लाख तर तीन लाख लिटर पॅकिंग  इग्लू डेअरी सर्व्हिसेस या खासगी कंपनीकडून केले जात होते. यासाठी प्रति लिटर 1 रुपये 60पैसे या दर होता. 31 मे रोजी करार संपल्यानंतर ठेकेदार कंपनीने 9 टक्के म्हणजेच प्रतिलिटर 0.14 पैसे दरवाढीची मागणी केली होती. ही अवास्तव वाढ असल्याने गोकुळ दूध संघाने नकार दिला. 

सहकार तत्त्वावर असलेल्या महानंदला आर्थिकद़ृष्ट्या भक्कम करण्यासाठी हातभार लावण्यासाठी पॅकिंग करार करण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या होत्या. त्यानुसार दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या दालनामध्ये या करार पत्रावर स्वाक्षरी  झाल्या. 

यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, चेअरमन विश्वास पाटील, महानंदचे चेअरमन रणजित देशमुख, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, महानंदचे व्हा. चेअरमन डी. के. पवार, महानंदचे कार्यकारी संचालक श्यामसुंदर पाटील, आदी उपस्थित होते.

Back to top button