कृष्णा, वारणेची पाणी पातळी ओसरली | पुढारी

कृष्णा, वारणेची पाणी पातळी ओसरली

सांगली : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपासून कोयना आणि वारणा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने येथे कृष्णा नदीची पाणी पातळी शुक्रवारी सकाळी 23 फुटांपर्यंत वाढली होती; मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने सायंकाळी पाच वाजता ती 20.9 फुटांपर्यंत खाली आली. 

दरम्यान, कोयना आणि वारणा धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने पुन्हा पाणी पातळीत वाढ होणार असून धोका कायम आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी दिवसभर अधून – मधून सरी सुरुच होत्या. येथील त्रिकोणी बागेजवळ रस्त्यालगत असलेले झाड सायंकाळी कोसळले. 

यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसात सुरुवातीच्या टप्यातच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र तारांबळ उडाली.  अनेकांनी पेरणी केलेली पिके पाण्या खाली गेली. काही ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेले.  कृष्णा नदीची पाणी पातळी  रात्रीत पाणी पातळी चारफुटाने वाढली होती.   मात्र सायंकाळी  ती कमी झाली होती. 

कोयनेतून 2 हजार 100 आणि वारणा धरणातून 1 हजार 600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  त्यामुळे पुन्हा पाणी पातळीत वाढ होऊन पुराचा धोका कायम आहे. 

म्हैसाळ-कनवाड या गावांना जोडणारा कृष्णा नदीवरील बंधारा  पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कनवाड,हसूर, नृसिंहवाडी या गावांचा म्हैसाळ बंधारा मार्गानें म्हैसाळ,मिरजेशी असणारा संपर्क बंद झाला आहे. सध्या नदीच्या काठावर पाणीच -पाणी झाल्याने शेतकर्‍यांनी  पाणी उपसा मोटारी काढून घेतल्या आहेत.

वारणा नदीच्या पाणी पातळीत  वाढ झाल्याने  समडोळीतील कल्लोळी बंधारा पाण्याखाली गेला आहे.  त्यामुळे  कोल्हापूर जिल्ह्यातील  दानोळी,कोथळी, उमळवाड, शिरोळ या गावांचा संपर्क तुटला आहे

दरम्यान  जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 8 पर्यंत  24 तासात सरासरी 17.5  मि. मी. पावसाची नोंद झाली.त्यात सर्वाधिक पाऊस   शिराळा तालुक्यात 34.9 मि.मी. पावसाची नोंद झाली. 

जिल्ह्यातील24 तासांतील पाऊस

जिल्ह्यात   24 तासात आणि दि. 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये अशीः मिरज 18.8 (190.9), जत 4.7 (115.7), खानापूर-विटा 3.9 (64.7), वाळवा-इस्लामपूर 34.7 (201.9), तासगाव 11.9 (131.7), शिराळा 34.9 (256.6), आटपाडी 0.2 (64.4), कवठेमहांकाळ 11.2 (108), पलूस 23.5 (192.1), कडेगाव 10.1 (132.8) 

धरणातील पाणीसाठा

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता  टी.एम.सी.मध्ये अशी ः कोयना 35.13 (105.25), धोम  5.16 (13.50), कन्हेर 2.75 (10.10), दूधगंगा  8.76 (25.40), राधानगरी 2.51 (8.36),   उरमोडी 6.37 (9.97),   अलमट्टी  28.25 (123).  

 
धरण व पुलाजवळील पाण्याचा विसर्ग

कोयना धरण : 2100, वारणा धरण : 1600,  कृष्णा पूल कराड:  20327, आयर्विन पूल(सांगली): 32779,  राजापूर बंधारा: 84500

शुक्रवारी सायंकाळची पाणी पातळी

(फूट, इंचामध्ये, कंसात धोका पातळी) 

1)कृष्णा पूल कराड-13’5(55.0), 2)भिलवडी पूल – 23’0(53 ), 3)आयर्विन- 20’9(45), 4)राजापूर बंधारा 33’6(58)

Back to top button