तीन बंधारे अद्याप पाण्याखाली | पुढारी | पुढारी

तीन बंधारे अद्याप पाण्याखाली | पुढारी

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लजला दिवसभरामध्ये पावसाने उसंत घेतल्याने तालुक्यातील हरळी, इंचनाळ, जरळी या बंधार्‍यांवरील वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली असून केवळ ऐनापूर, निजली व नांगनूर हे बंधारे पाण्याखाली आहेत. हिरण्यकेशी पुलावरील वाहतूक सुरू झाल्याने गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील वाहतूक सुरू झाल्याने अनेकांची समस्या संपुष्टात आली आहे. शनिवारी दिवसभरामध्ये पावसाने उसंत दिल्याने पडझडीच्या घटनाही कमी झाल्याचेही दिसून आले.

गडहिंग्लज तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरात पाऊस झाल्याने सर्वच बंधारे पाण्याखाली गेले होते. यामुळे वाहतुकीचे नियोजन पूर्णतः कोलमडले होते. अनेकांना गडहिंग्लजमध्ये येण्याची अडचण झाल्याने विविध ठिकाणच्या कामांवरही परिणाम झाला होता. दरम्यान शनिवारी दिवसभरामध्ये पावसाने उसंत दिल्याने यातील काही बंधारे हे वाहतुकीसाठी खुले झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भडगाव पुलावरून शुक्रवारपासूनच वाहतूक सुरू झाल्याने वाहतुकीची समस्या सुटल्याचेही दिसून आले आहे.

तालुक्यातील या तीन बंधार्‍यांवरील पाणीही शनिवारी रात्रीपर्यंत कमी येण्याची शक्यता वर्तवली जात असून यामुळे रविवारी सकाळपासून येथील वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शनिवारी पडझडीच्या घटना अत्यंत तुरळक घडल्या असून यामुळे प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे. पावसाची उसंत अशीच राहिल्यास रविवारी शेतीची कामे वेग घेण्यास कोणतीच अडचण नसल्याने आज शेती सेवा केंद्रामध्ये खतांसह बियाणे खरेदीसाठी गर्दी झाल्याचेही दिसून येत होते.

Back to top button