डॉ. महापात्रा यांच्यामुळे कोल्हापूर विमानतळ पुन्हा जगाच्या नकाशावर | पुढारी

डॉ. महापात्रा यांच्यामुळे कोल्हापूर विमानतळ पुन्हा जगाच्या नकाशावर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर विमानतळ नव्याने सुरू करण्यात मोलाचे योगदान देणार्‍या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे माजी चेअरमन डॉ. गुरूप्रसाद महापात्रा यांचे शनिवारी निधन झाले. डॉ. महापात्रा यांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच कोल्हापूर विमानतळ पुन्हा जगाच्या नकाशावर आले. कोल्हापूर विमानतळाला गती मिळाली, असे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.   

केंद्र सरकारने 2017 मध्ये उडान योजना सुरू केली. उडान योजनेंतर्गत देशात नऊ विमानतळे मंजूर झाली. मात्र, उडान योजनेतील विमानांचे उड्डान पहिल्यांदा कोल्हापुरातून झाले. कोल्हापूर विमानतळासाठी डॉ. महापात्रा यांनी विशेष प्रयत्न केले. खासदार म्हणून कार्यरत असताना या विमानतळासाठी त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होतो. त्यामुळे बंद पडलेल्या कोल्हापूर विमानतळाच्या उड्डाणासाठी त्यांनी मोठे योगदान दिल्याचे  महाडिक यांनी सांगितले. 

डॉ. महापात्रा एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन असताना त्यांच्या कालावधीत कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाचा तब्बल 274 कोटींचा आराखडा मंजूर झाला. आराखड्यात एटीसी टॉवर, पार्किंग हब, रनवे विस्तारीकरण, रनवेची सुरक्षा, अग्निशमन यंत्रसामुग्री, सुरक्षिततेसाठी नवे गेट, इमर्जन्सी एक्झीट, रनवेवरील प्रपोशन अ‍ॅप्रोच पाथ इंडिकेटर आणि रनवे एंड सेफ्टी एरियासह आवश्यक कामांचा समावेश आहे. यासह टर्मिनल बिल्डिंगही प्रस्तावित आहे. कोल्हापूरसाठी ते विशेष आग्रही होते. कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी त्यांनी खूप मदत केली, असेही महाडिक यांनी सांगितले.

Back to top button