माजी महापौर सासने यांचे कोरोनाने निधन | पुढारी

माजी महापौर सासने यांचे कोरोनाने निधन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा  

शिवाजी पेठेतील रहिवासी, ज्येष्ठ पत्रकार, माजी महापौर विलासराव माधवराव सासने (वय 83) यांचे कोरोनाने निधन झाले. गेल्यावर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी कोरोनावर मात केली होती. आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्यांना लागण झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी त्यांंचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या सासने यांच्यावर फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता. तत्कालीन मंत्री स्व. चंद्रकांत बोंद्रे आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकिक होता. शिवाजी पेठेतील पहिले आणि सभागृहातील पाचवे महापौर होण्याचा बहुमान त्यांना लाभला. ते शिवाजी विद्यापीठात नोकरीस होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा देऊन शिवाजी पेठेतून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवून ते विजयी झाले. 20 ऑगस्ट 1982 रोजी ते महापौरपदी विराजमान झाले. महापौरपदी असताना थेट पाईपलाईनसाठी त्यांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. शिवाजी पेठेतील सरदार तालमीचे चिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या कार्यकालात महापालिकेचे  सीनिअर महाविद्यालय सुरू झाले. विविध सामाजिक चळवळींत त्यांचा सक्रिय सहभाग होता. कोल्हापूर सिटीझन फोरमचे अध्यक्ष म्हणून त्यांनी व्यसनमुक्ती व समाजप्रबोधन केले.

त्यांचा व्यासंग मोठा होता. संगीत कलेची त्यांना आवड होती. ते सतारवादनात प्रवीण होते. शिवाजी पेठेतील सार्वजनिक कामांत ते अग्रभागी होते. विविध वृत्तपत्रांत त्यांनी पत्रकार म्हणून काम पाहिले. पत्रकार हौसिंग सोसायटीच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता.

Back to top button