साळगाव मार्गावरील झाडे देतायेत अपघाताला निमंत्रण | पुढारी

साळगाव मार्गावरील झाडे देतायेत अपघाताला निमंत्रण

आजरा : पुढारी वृत्तसेवा

आजरा-साळगाव मार्गावरील रस्त्याकडेला अनेक मोठमोठी झाडे रस्त्यावर झुकलेल्या अवस्थेत आहेत. ही झाडे धोकादायकरीत्या उभी असून वादळी वारा व पावसात कधी रस्त्यावर पडतील काही सांगता येत नाही. परिणामी यामुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याकडील अशी धोकादायक झाडे काढून घेण्याची मागणी प्रवासी व वाहनधारकांकडून होत आहे. 

आजरा-साळगाव मार्गावरील रस्त्याच्याकडेला जंगल परिसर आहे. त्यामुळे अष्टमबाभूळ, गुलमोहर यासह अन्य जातीची मोठ-मोठी झाडे उभी आहेत. यातील बरीच झाडे ही रस्त्यावर झुकलेल्या अवस्थेत पहावायस मिळतात. आजरा तालुक्यात पावसाचे प्रमाण प्रचंड असल्याने पावसाळ्यात अशी धोकादायक झाडे रस्त्यावर पडतात. यापूर्वी तालुक्यात झाडे रस्त्यावर कोसळण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. पावसाबरोबरच वादळी वारा मोठ्या प्रमाणावर सुटल्याने अशी झाडे रस्त्यावर कोसळून एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजरा-साळगाव मार्गावर अशी धोकादायक, रस्त्यावर झुकलेली झाडे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. संबंधित विभागाने अशी धोकादायक झाडे काढून घ्यावीत, अशी मागणी वाहनधारक व प्रवाशांमधून होत आहे.

धोकादायक झाडे तोडण्याबाबत पाठपुरावा करणार : कांबळे

काही दिवसांपूर्वीच गडहिंग्लज मार्गावर धोकादायक वृक्ष कोसळून दोघांना जीव गमवावा लागला. अशी घटना या मार्गावर घडू नये याकरिता तातडीने धोकादायक वृक्ष तोडण्याबाबत संबंधित विभागाकडे मागणी करणार आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती साळगावच्या सरपंच पूजा कांबळे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

Back to top button