रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस-मायनसचा रुग्ण नाही  | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस-मायनसचा रुग्ण नाही 

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यामध्ये डेल्टा प्लस-मायनस या पैकी कोणताही नवा स्ट्रेन असलेला रुग्ण सापडलेला नाही. मात्र, चार गावांतील रुग्णांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आणखी शंभरजणांचे नमुने पाठविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले. ऑनलाईन पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.  पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटकडून अधिकृत काही जाहीर होत नाही, तोपर्यत गैरसमज पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

जिल्ह्यात नऊ रुग्णांबाबत संशय आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी गेले आहेत. ते कोणत्या स्टेनचे आहेत हे स्पष्ट झालेले नाही. तो नवीन स्टेन आहे का? की नाही हा संशोधनाचा विषय आहे. कोरोनामध्ये गेल्या काही महिन्यात बदल झालेला दिसत आहे. मात्र, त्याचा किती परिणाम आजुबाजूच्या परिसरावर होतो हेही तपासणे आवश्यक आहे. 

संगमेश्‍वर तालुक्यातील काही गावात कोरोना डेल्टा प्लसचे रुग्ण असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. परंतु, असे कोणतेही रुग्ण सापडलेले नाही. चार-पाच गावात सुमारे पाच हजारहून अधिकजणांची तपासणी करण्यात आली असून यात 52 नागरिक पॉझिटिव्ह सापडले आहेत. हे प्रमाण जवळपास एक टक्‍का इतके आहे. हा भाग वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत आहे. जिल्हा प्रशासनालाही राज्याच्या आरोग्य विभागाकडुन काहीच माहिती देण्यात आलेली नसल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

आणखी 100 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. नवी मुंबई, पालघर आदी ठिकाणाहून नवीन स्ट्रेनबाबत माहिती पुढे येत आहे. त्यामुळे सतर्कता बाळगली आहे. कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी खबरदारी घेऊन नाकाबंदी केलेली आहे. 

संगमेश्‍वर बाजारपेठही बंद ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोबाईल टीम ठेवण्यात आलेली असून मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी वाढल्याचे दिसून आलेले नसल्याचेही मिश्रा यांनी सांगितले. जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण 4 हजार 800पर्यत खाली आले आहे. कोणीही या व्हेरिएंटला नाव देऊ नये राज्य शासनाकडून या बाबत अधिकृत माहिती दिली जाईल असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन बेड 40 टक्के आहे तर 60 टक्के बेड रिकाम्या आहेत. पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून कमी आला आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसारच निर्बंध शिथिल करायचे की, कडक या बाबत निर्णय घेतला जाईल, असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले.

 

Back to top button