दुपारी रिकाम्या धावताहेत लोकल | पुढारी | पुढारी

दुपारी रिकाम्या धावताहेत लोकल | पुढारी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

उपनगरीय लोकलने फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची परवानगी आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळची पीक अवरची वेळ सोडली तर दुपारच्या वेळेत लोकल रिकाम्याच धावत आहेत. सध्या मध्य रेल्वेवर दिवसभरात लोकलच्या 1685, तर पश्चिम रेल्वेवर 1300 फेर्‍या चालविण्यात येत आहेत. यातून सुमारे 22 ते 25 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत.

कोरोनापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दिवसाला तब्बल 80 ते 82 लाख प्रवासी प्रवास करायचे. मध्य रेल्वेवर दिवसाला लोकलच्या 1774 फेर्‍यांमधून 42 लाख, तर पश्चिम रेल्वेवर 1376 लोकलमधून 40 लाख प्रवासी प्रवास करायचे. कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या वर्षी 22 मार्चपासून उपनगरीय लोकलची सेवा बंद करण्यात आली.

15 जूनपासून फक्त अत्यावश्यक सेवेकर्‍याकरिता मर्यादित लोकल सुरू करण्यात आल्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महिला, वकील फार्मासिस्ट यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. 1 फेब्रुवारी 2021 पासून सर्वसामान्य मुंबईकरांना वेळेच्या बंधनात लोकल प्रवास करण्यास परवानगी मिळाली. परंतु मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातल्याने पुन्हा 1 एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आणि मुंबईकरांचा लोकल प्रवास बंद झाला. 

यावेळेत तरी प्रवासाला परवानगी द्या !

सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच लोकल प्रवास करत आहेत. हे सर्व प्रवासी सरकारी कार्यालयांमध्ये असल्याने त्यांच्या कामाची वेळ ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच असते. फक्त रुग्णालय आणि महापालिका कर्मचारी विविध शिफ्टमध्ये काम करतात. त्यामुळे लोकलला सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेतच गर्दी होत आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत लोकल रिकाम्याच धावत आहेत. त्यामुळे या वेळेत सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे.

उपनगरीय रेल्वेला 1500 कोटींचा तोटा

सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई असल्याने मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गाला आत्तापर्यंत 700 कोटी तर पश्चिम रेल्वेला सुमारे 700 ते 750 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

 

Back to top button