सावधान… बिबट्या आपला शेजारी बनतोय! | पुढारी

सावधान... बिबट्या आपला शेजारी बनतोय!

सांगली : शशिकांत शिंदे

आजपर्यंत केवळ चांदोली अभयारण्यापर्यंत सीमित असलेला बिबट्याचा वावर आजकाल जिल्हाभर आढळून येऊ लागला आहे. जिल्ह्यात सर्वत्र उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने आणि बिबट्यास आवश्यक असलेले खाद्य आणि पोषक वातवरण उपलब्ध असल्याने त्याचा वावर वाढला असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्‍त करीत आहेत. 

चांदोली अभयारण्यामुळे शिराळा तालुक्यात बिबट्या किंवा जंगली प्राण्याचे दर्शन वरचेवर होत असते. गेल्या काही वर्षात वाळवा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढलेला आहे. बागणी परिसरात बिबट्या सतत दिसून येतो. चार महिन्यांपूर्वी बिबट्या सांगली शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजवाडा चौकात आला होता. काही दिवसांपूर्वी तो बागणी येथे दिसून आला होता. आता  अलकूड (एम) येथे दिसून आल्याने   बिबट्याचा  वावर सर्वत्रच असल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या काही वर्षात ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ या योजना आणि सिंचनाच्या सुविधा झाल्याने बागायती क्षेत्र सर्वत्रच मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  बिबट्याला ऊस हे राहण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आहे. त्याशिवाय उसात उंदीर, घुशी, खेकड आदि प्राणी अढळून येतात. हे खाद्य आणि पाणी उपलब्ध असल्याने बिबट्याची संख्या आणि वावर वाढला असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

बिबट्या हा वाघांच्याच कुळातला. मात्र परिस्थितीशी जुळवून घेण्याची बिबट्यांची क्षमता वाघांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे वाघांची संख्या झपाट्याने घटत असताना, बिबट्यांची संख्या समाधानकारक राहिली आहे. बिबटे हे जंगलाच्या परिघावर वास्तव्य करणारे. जंगलात भक्ष्य मिळेनासे झाले की मानवी वस्तीत ते शिरतात. उसाच्या फडातही ते वास्तव्य करू शकतात. पूर्ण वाढ झालेल्या नर बिबट्याचेे दहा तेे बारा किलोमीटरच्या परिसरात स्वतःचे स्वतंत्र कार्यक्षेत्र असते. मात्र, बिबट्यांची संख्या वाढल्यावर त्यांचे कार्यक्षेत्रही विस्तारू शकते. बिबट्यांच्या नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या वेगाने वाढत आहे.   

सागरेश्‍वर, दंडोबा परिसरात बिबट्या प्रथमच

सागरेश्‍वर, दंडोबा परिसरात बिबट्या असल्याची नोंद इतिहासात नाही.  मात्र गेल्या काही वर्षांपासून या भागात वनक्षेत्र वाढत आहे. सागरेश्‍वर येथे काही दिवसापूर्वी बिबट्या दिसून आला. आता दंडोबापासून जवळच असलेल्या अलकूड एम येथे बिबट्या दिसून आला आहे.   सांभर, भेकर, तरस, कोल्हा, लांडगा या प्रमाणे बिबट्यासुद्धा या परिसरात दिसून येत आहे.  

ऊस शेती बिबट्याला ठरते आहे पोषक ः पापा पाटील

बिबट्या हा भित्रा प्राणी आहे. तो स्वतः हून कधी हल्ला करीत नाही. उसामध्ये संरक्षण, पाणी आणि खाद्य मिळत आहे. त्यामुळे बिबट्याचा अधिवास वाढण्यासाठी ऊस शेती पोषक ठरत आहे. या  भागात  आढळणार्‍या बिबट्यांचे प्रजनन ऊस शेतीमध्ये झाले आहे. बिबट्याची मोजणी केली जात नसली तरी त्याची संख्या वाढली असण्याची शक्यता आहे.

 

Back to top button