कळविकट्टे येथे कत्तलखान्याला विरोध | पुढारी | पुढारी

कळविकट्टे येथे कत्तलखान्याला विरोध | पुढारी

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

कळविकट्टे येथे कत्तलखाना सुरू होणार असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. याबाबत सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने याविरोधात यल्गार पुकारला आहे. हा कत्तलखाना तातडीने रद्द करावा, याला कोणतीही शासकीय परवानगी देऊ नये; अन्यथा याविरोधात उग्र आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलिस प्रशासनाला दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, सन 2014 मध्ये या कत्तलखान्याचे मालकांनी नोटरी करून घेऊन या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कसाईखाना अथवा त्या संबंधाचा व्यवसाय करणार नाही, असे लेखी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करुन बांधकाम केले होते. 2018 मध्ये ग्रामपंचायतीकडून सदर मालकाने शेळी-मेंढी व कोंबडी यासाठी स्वतंत्र परवानगी घेतली होती. मात्र, त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, रेडा या पाळीव प्राण्यांवर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करायची नाही, असे नमूद केले होते. 

मात्र, सदर मालकाने सरपंच, सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांची दिशाभूल करून गावातील काही मुलांना बोलावून आमिष दाखवून या ठिकाणी मी कत्तलखाना सुरू करणार असल्याचे सांगून बेकायदेशीररीत्या कत्तलखान्याचे बांधकाम करून मशिनरी बसविली आहे.

यालगत महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर असून, या ठिकाणी हा कत्तलखाना सुरू झाला तर ग्रामस्थांच्या भावना दुखावण्याबरोबरच प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच सदर मालकाविरोधात यापूर्वी कर्नाटक राज्यात याबाबत गुन्हे दाखल झाले असून, ते सध्या न्यायप्रविष्ट आहेत. अशा परिस्थितीत या मालकाने बळजबरीने अथवा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कत्तलखाना सुरू करण्याचे धोरण अवलंबले तर गावातील सर्व ग्रामस्थ या विरोधात तीव— आंदोलन करून अन्यायाविरोधात लढतील.

यामुळे  प्रस्तावित कत्तलखान्याचे काम तातडीने थांबविणे आवश्यक असून, प्रशासनाने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच दयानंद पाटील यांच्यासह सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक आनंद कोठावळे व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Back to top button