मेळावलीचे आंदोलन शमले, पण धग कायम

पणजी : मनाली प्रभुगावकर
शेळ-मेळावली भागात सहा महिन्यांपूर्वी प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाविरोधात उडालेला भडका शमला असला तरी, त्याच्या दूरगामी परिणामातून कोणताही ग्रामस्थ सुटलेला दिसत नाही. या प्रकल्पाविरोधात आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे अजून मागे घेतले नसल्याने त्यांना पुढे नोकर्यांसाठी अर्जही करता येणार नसल्याची स्थिती दिसू लागली आहे. त्यातूनच नोकर्यांची आस बाळगून असलेल्या युवकांना आता भविष्याची चिंता सतावू लागली आहे.
मेळावलीतून आयआयटी प्रकल्प स्थलांतरित
करण्याचा निर्णय झाल्यानंतर मंत्री विश्वजीत राणे यांनी 40 ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासनही दिले होते. मात्र, सरकारने त्यासाठी काहीच हालचाल केलेली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने युवकांची पुरती झोप उडाली आहे.
मेळावलीवासीयांची न्यायालयात बाजू मांडणार्या अॅड. कॅरोलिना कुलासो यांच्याशी ‘पुढारी’ ने संपर्क साधला असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आयआयटी आंदोलनात मेळावलीतील 40 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील सुमारे 15 जण युवक आहेत. काहीजण शिक्षण संपवून नोकरीच्या प्रयत्नात आहेत. काहींना नोकरीसाठी परदेशात जायचे आहे.
जोपर्यंत सरकार मेळावलीवासियांवरील एफआयआर मागे घेत नाही, तोपर्यंत त्याचा परिणाम येथील लोकांवर होत राहणार आहे. त्यामुळे आयआयटी येथून हटले तरी त्याची धग अजूनही गावाला अस्वस्थ करणारी आहे.
नोकरीची संधी गमावली
मी विशाखापट्टणम येथील इंडियन मेरिटाइम विद्यापीठातून बी-टेक नेवल आर्किटेक्चर अॅण्ड ओशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. या शिक्षणासाठी कर्ज घेतले होते आणि ते लाखांच्या घरात आहे. मी एका कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र, ज्यावेळी माझी पार्श्वभूमी तपासण्यात आली, तेव्हा आंदोलनामुळे असलेला गुन्हा समोर आला; त्यामुळे नोकरी गेली. शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळावी, असे मला वाटतेे. मात्र, त्या आड आता दाखल केलेला गुन्हा येत आहे. यामुळे मानसिक त्रासही प्रचंड होतो, असे शुभम मेघनाथ शिवोलकर याने सांगितले.