पॉपलीन यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय | पुढारी

पॉपलीन यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय

इचलकरंजी ः पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजीतील पॉपलीन यंत्रमाग कारखानदारांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत उत्पादन कमी करण्याच्या अनुषंगाने कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत  घेतला. पॉपलीन यंत्रमागधारकांच्या या निर्णयामुळे   इचलकरंजीतील 8 ते 10 हजार यंत्रमागांवर अंदाजे दिवसाला 15 लाख मीटरचे उत्पादन ठप्प होणार असून, जवळपास महिन्याकाठी 100 कोटी रुपयांचे उत्पादन थांबणार असल्याने यंत्रमागधारकांना याचा फटका सहन करावा लागणार  आहे.

गेल्या काही वर्षांपासून वस्त्रोद्योग व्यवसाय अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. अशातच गतवर्षीपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे अडचणीत भर पडली आहे.  उत्पादन खर्चापेक्षा जादा नुकसान सोसून पॉपलीन  कापडाची विक्री करावी लागत आहे. या अनुषंगाने उत्पादन कमी करण्यासंदर्भात बुधवारी पॉवरलूम असोसिएशनमध्ये बैठक पार पडली.

गेल्या चार महिन्यांपासून पॉपलीन कापड उत्पादन खर्चापेक्षा मीटरला 2 ते 2.50 रुपये कमी दराने विकले जात आहे. त्यातच दररोज सुताचे दर वाढत आहेत. कापडाला मागणी नसल्यामुळे  पॉपलीन कापडाच्या खरेदी दराची परिस्थिती सुधारेपर्यंत पॉपलीन कापड उत्पादन घेणारे यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.  

मजुरीने बिमे देणार्‍या व सटधारक यंत्रमागधारकांनी या निर्णयास सहमती दर्शवली. त्याचबरोबर या बैठकीत भिवंडी, मालेगाव व विटा या ठिकाणच्या यंत्रमाग संघटनांच्या पदाधिकार्‍यांबरोबर सर्व यंत्रमाग केंद्रामध्ये समन्वय ठेवण्यासाठी बैठक घेण्याचेही ठरविण्यात आले. बैठकीस कैश बागवान, दिलीप ढोकळे, श्रीशैल कित्तुरे, सुनील पाटील, तुकाराम सावंत, चंद्रकांत पाटील, प्रमोद महाजन, सोमा वाळकुंजे, पॉपलीन कारखानदार फिरोज जमखाने, जयवंत अचलकर, आनंदा होगाडे, अशोक घट्टे, राजेंद्र राशिनकर आदी उपस्थित होते.

Back to top button