संगमेश्‍वरात व्यापार्‍यांचा सीईओंना घेराव | पुढारी | पुढारी

संगमेश्‍वरात व्यापार्‍यांचा सीईओंना घेराव | पुढारी

संगमेश्वर : पुढारी वृत्तसेवा

कंटेन्मेंट झोन आणि बाजारपेठेत ‘अनिश्चित काळासाठी बंद’विरोधात संतप्त झालेल्या व्यापार्‍यानी संगमेश्वर बाजारपेठेजवळ आलेले तहसीलदार सुहास थोरात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना मंगळवारी घेराव घातला. 

जिल्हाधिकारी यांनी संगमेश्वर तालुक्यातील पाच गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संतप्त झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतरही बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही.  या उलट अधिकच नियम कडक करण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. 

मंगळवारी सकाळच्या दरम्यान मुख्य कार्यकारी 

अधिकारी आणि तहसीलदार सुहास थोरात संगमेश्वरात बुरंबी येथे कोविड विलगीकरण कक्षाच्या  उद्घाटनासाठी येणार असल्याचे समजताच संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संगमेश्वर सोनवी चौक येथे एकत्र आले आणि त्यांनी जि. प. मुख कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी व्यापारी सुशांत कोळवणकर यांनी व्यापार्‍यांची होणार फरफट आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक याबाबत सांगितले. यावेळी बोलताना फारूक पठाण म्हणाले की, संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संयमी आहेत. मात्र, आता संयमाचा अंत झाला आहे बुधवारपर्यत निर्णय द्या नाहीतर गुरुवारपासून दुकाने उघडू, असे सांगितले. यावेळी बोलताना व्यापारी संघाचे सचिव अनिल भिडे म्हणाले की, संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापार्‍यानी कधीही आंदोलन केले नाही. मात्र, आंदोलन करण्यास भाग पाडू नका, असे सांगितले 

अन्यथा उद्यापासून बाजारपेठ सुरू

व्यापार्‍यांना मिळणार्‍या वागणुकीचा पाढा वाचत बाजारपेठ सुरू करा, दुकाने उघडायला परवानगी दिली नाही, तर गुरुवारपासून व्यापारी स्वतः दुकाने उघडतील. प्रशासनाने कारवाई केल्यास कारवाईला सामोरे जायला सर्व व्यापारी एकजुटीने तयार आहेत. अशा प्रकारचे निवेदन व्यापारी संघाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी जमा झाले होते.

 

Back to top button