कणकवलीत सापडला ‘डेल्टा प्लस’चा रुग्ण | पुढारी

कणकवलीत सापडला ‘डेल्टा प्लस’चा रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’ या कोव्हिड 19 प्रकारातील पहिला रुग्ण कणकवली तालुक्यात मिळाला आहे. राज्यात ‘डेल्टा प्लस’ या प्रकारातले 21 रुग्ण सापडले आहेत. या आजारापैकीच एक रुग्ण जिल्ह्यात सापडला आहे. या रुग्णावर त्याच्या घरीच उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

कोव्हिड 19 या विषाणूमधीलच अधिक वेगाने पसरणारा आणि अधिक घातक असणारा हा आजार आहे. या आजाराच्या प्रकारावर लसीचा कोणताही परिणाम होत नाही. तसेच या प्रकाराची तपासणी मुंबई येथील संशोधन केंद्रात होते. ही तपासणी करण्यासाठी या संशोधन केंद्रातील कर्मचारी स्वत: येऊन तपासणी करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशीच तपासणी करण्यात आली होती. यात हा रुग्ण सापडला आहे. या रुग्णाला कोणतीही ट्रव्हल हिस्ट्री नसून या रुग्णावर त्याच्या घरीच उपचार सुरू आहेत. या रुग्णाचे इतर नातेवाईकही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र, हे नातेवाईक डेल्टा प्लस नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

‘त्या’ गृह संकुलातील 221 नागरिकांची होणार स्वॅब टेस्ट

कणकवली-आढळलेल्या नवीन स्ट्रेनचा रूग्ण राहत असलेल्या गृहसंकुलातील 221 नागरिकांची आरटीपीसीआर स्वॅब टेस्ट होणार आहे. रुग्ण 52 वर्षीय पुरूष असून त्याचा कोरोना तपासणी अहवाल 21 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुर्नत: बरा होवून तो रूग्ण घरी परतला आहे.  मात्र, त्याच्या स्वॅबमध्ये कोविड 19 चा नवीन स्ट्रेन आढळून आल्याने त्या संकुलात राहत असलेल्या सर्वच नागरिकांची स्वॅब टेस्ट होणार आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मंगळवारी त्या गृहसंकुलाला भेट देत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. बुधवारी आरोग्य विभागाच्या टीमकडून नागरिकांची स्वॅब टेस्ट होणार आहे. तसेच गृहसंकुल परिसरात 14 दिवसांसाठी पुन्हा कंटेन्मेंट झोन लागणार असून त्या भागात कोरोना विषयक पुन्हा सर्व्हेक्षण होणार आहे.  

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना सुरू       

जिल्ह्यात कोविड 19 आजाराचा नवीन स्ट्रेन ( डेल्टा प्लस ) कणकवली परबवाडी येथे सापडला असून बाधीत भागात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड 19 बाधित व्यक्‍तीच्या संपर्कातील नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. इली, सारी आजारातील रुग्णांची व त्यांच्या लक्षणांबाबत सर्वेक्षण सुरू आहे. त्याचबरोबर कोविड 19 चे लसीकरणही करण्यात येत आहे. त्याशिवाय पुनःसंसर्गासाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या भागातील नागरिकांनी कोविड 19 साठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील वैयक्‍तीत सुरक्षिततेबाबत नियमित हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे नियमित पालन करावे आणि ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

 

Back to top button