आता बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्याचा घाट | पुढारी

आता बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्याचा घाट

सोलापूर : प्रताप राठोड

सोलापूरच्या हक्काचे पाणी पळवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता पुन्हा सोलापूरकरांवर अन्याय  होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई-हैदराबाद ही सोलापुरातून जाणारी प्रस्तावित बुलेट ट्रेन आता नांदेडमार्गे नेण्याचा घाट घातला जात आहे. राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तसे मागणी पत्र दिले आहे. यामुळे सोलापुरातून जाणारी महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच पळवण्याचा डाव काँग्रेसकडून रचला जात असल्यामुळे सोलापूरकरांमधून संताप व्यक्त होत आहे.

सोलापूर रेल्वेस्थानक हे दक्षिण भारताला जोडणारे रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाते. रेल्वेच्या जाळ्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी तसेच व्यापार्‍यांना येथील माल हा देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवण्यास मदत होत आहे. सोलापूर रेल्वेस्थानक तसेच सोलापूर जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनच्या  मार्गामध्ये सोलापूर स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबई ते हैदराबाद या मार्गातील एकूण 11 मार्गांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, पंढरपूर आणि सोलापूर या तीन रेल्वेस्थानकांचा प्रस्तावित स्थानकामध्ये समावेश होणार आहे.

महाराष्ट्रातील नियोजित बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी राष्ट्रीय स्तरावर होण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची स्थापना झाली. बांधकाम सुरू करण्याच्या मुलभूत निविदा उपक्रम सुरू आहे. या मार्गाचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) यांच्याकडून सर्व्हे करण्यात येत आहे. लेझर उपकरणे ही विमान तसेच हेलिकॉप्टरमध्ये बसवून सर्वेक्षण केले जात आहे. सोलापूरपर्यंत या मार्गाचे सर्वेक्षणदेखील झालेले आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातून गेल्यास याचा फायदा सोलापूरकरांना होणार आहे. केंद्रीय प्रकल्प असल्यामुळे बुलेट ट्रेन मार्गावरील शेतकर्‍यांना याचा मोबदला चांगला मिळणार असून, या परिसरातील शेतीलाही चांगला भाव येणार आहे. यामुळे आर्थिक प्रगती होण्यासदेखील चालना मिळणार आहे. शिवाय प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची सोय अधिक प्रमाणामध्ये होणार आहे.

महत्त्वाकांक्षी असा बुलेट ट्रेनचा सोलापुरातील मार्ग जात असताना हा मार्ग बदलून नांदेडमार्गे नेण्यासाठी  राज्य मंत्रिमंडळातील बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनामध्ये मुंबई-पुणे-सोलापूरमार्गे हैदराबाद जाणार्‍या मार्गामध्ये बदल करून मुंबई-औरंगाबाद-जालना-नांदेड-हैदराबाद या मार्गाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याची मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाचे असलेले माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान मंत्री अशोक चव्हाण यांनी सोलापुरातून जाणार्‍या बुलेट ट्रेनचा मार्ग बदलून त्यांच्या स्वतःचा जिल्हा असलेल्या नांदेड जिल्ह्यातून बुलेट ट्रेन नेण्याची मागणी केल्यामुळे सोलापूरकरांमध्ये आता नाराजी पसरू लागली आहे.

सोलापूर जिल्ह्याचे खमके नेतृत्व राज्यस्तरावर नसल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सोलापुरास दुय्यम स्थान देण्यात येत असल्याची भावना सोलापुरातील जनतेमध्ये आता आणखी वाढू लागली आहे. मागील महिन्यामध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीतून पाणी इंदापूरला नेण्याचा घाट घातला होता. याला लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटनांनी प्रखर विरोध केला होता. सोलापूरकरांच्या लढ्यामुळे सरकारला निर्णय बदलावा लागला. आता परत  सोलापुरातून जाणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बदलण्याचा घाट घातला जात असून पुन्हा सोलापूरकरांनी विकासासाठी एकजूट दाखवण्याची गरज व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसवर असंतोष

राष्ट्रवादी पक्षाचे असलेले सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीच्या विषयावर सोलापूरविरोधी भूमिका घेतल्याची भावना सोलापूरकरांमध्ये निर्माण झाली. पालकमंत्र्यांच्या निर्णयामुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी नाराजी वाढली होती. ही नाराजी कमी करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेटाने प्रयत्न करून निर्णय बदलल्यामुळे वातावरण निवळले होते. आता पुन्हा काँग्रेसच्या बड्या नेत्याने सोलापुरातून जाणार्‍या बुलेट ट्रेन मार्ग बदलण्याची मागणी केल्यामुळे काँग्रेस पक्ष हा जनतेच्या रडारवर आला आहे. सोलापुरातील काँग्रेसचे नेते याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सोलापूरवासियांचे लक्ष राहणार आहे.

 

Back to top button