पुणे : आंबिल ओढा झोपडपट्टी कारवाईला स्थगिती | पुढारी

पुणे : आंबिल ओढा झोपडपट्टी कारवाईला स्थगिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आंबिल ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) प्रकल्पांतर्गत रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी हाती घेतली. मात्र, रहिवाशांनी याला विरोध केल्याने गोंधळ आणि वादावादी झाली. याविरोधात नागरिकांनी महापालिकेच्या न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली.

आंबील ओढ्या लगत वसलेल्या फायनल प्लॉट क्र २८ येथील झोपडपट्टीची जागा पालिकेच्या मालकीची असून या प्लॉटवर जवळपास १३४ घरे आहेत. या झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या नागरिकांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांकडून पुनर्वसन केले जाणार आहे. यासाठी झोपडपट्टीच्या बाजुला इमारतीचे कामही सुरू आहे. या ठिकाणी जवळपास सातशे नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून रहिवाशांना नाल्याच्या आसपासची घरे खाली करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र, महापालिका प्रशासन, विकासक बिल्डराच्या घशात जागा घालण्यासाठी आम्हाला घरे खाली करण्याची नोटीस देत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला. बिल्डरसाठी आंबील ओढा वळवण्याचा आणि शेकडो कुटुंबाना बेघर करण्याचा घाट प्रशासनाने घातल्याचा आरोप कर मागील आठवड्यात आंबील ओढा नागरी कृती समिती आणि बहुजन एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका व एसआरएच्या अधिकार्‍यांना काळे झेंडे दाखवत हुसकावून लावले होते. दिशाभूल करणारे काम थांबवा आणि सर्वाना विश्वासात घेऊनच काम करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

त्यानंतर महापालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी पोलिसांचा मोठा फैजफाटा घेवून नाल्याशेजारच्या झोपड्या काढण्याची कारवाई हाती घेतली. येथील नागरिकांचे तात्पूरत्या स्वरूपात राजेंद्र नगर येथील सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

 मत्र, रहिवाशांना या कारवाईला प्रखर विरोध करत घोषणाबाजी सुरू केली. नागरिक, प्रशासन यांच्यात वादावादी आणि धक्काबुक्की सुरू झाली. या गोंधळातच दोघांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. पुढाली अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांनी अंगावर रॉकेल ओतून घेणार्‍यांना तात्काळ ताब्यत घेतले. रहिवासी महिलांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. या सर्व गोंधळातच महापालिकेच्या जेसीबींनी पाच ते सहा घरे जमिनोदस्त केली. काही रहिवाशांनी या गोंधळातच हाती लागेल ते साहित्य घेवून पालिकेने तात्पुरते पुनर्वसन केलेल्या ठिकाणी जाण्याचा मार्ग निवडला.

रहिवासी आणि प्रशासन यांच्यात वादावादी सुरू असतानाच आणि पालिकेचे जेसीबी नागरिकांची घरे जमिनोदस्त करत असतानाच येथील रहिवासी हनुमंत फडके यांनी या कारवाईविरोधात महापालिकेच्या न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तक्रारदार आणि महापालिकेची बाजू ऐकून घेतल्यानंतर घरे पाडण्याची कारवाई पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले. हे आदेश कारवाई करणार्‍या यंत्रणेला कळताच सर्व यंत्रणा मागे घेवून कारवाई थांबवण्यात आली. दरम्यान, पाडलेली घरे कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांनी त्वरित बांधुन द्यावीत, अशी मागणी करत रहिवाशांनी उपस्थित अधिकार्‍यांना धारेवर धरले. तर अनेक नागरिकांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करत विजयाच्या घोषणा दिल्या.

Back to top button