जि. प. सदस्यांना शाहू पुरस्कार जाहीर | पुढारी

जि. प. सदस्यांना शाहू पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने सदस्यांना देण्यात येणार्‍या राजर्षी शाहू पुरस्कार व उत्कृष्ट पत्रकारांसाठी देण्यात येणार्‍या आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराची घोषणा जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष बजरंग पाटील व  उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी गुरुवारी केली.

राजर्षी शाहू पुरस्कारासाठी निवड झालेल्यांमध्ये शिल्पा चेतन पाटील (काँग्रेस), विनय पाटील (राष्ट्रवादी), विजय भोजे व कल्पना चौगुले (भाजप), शिवानी भोसले व पूनम राहूल मगदूम-महाडिक (शिवसेना) आणि विशांत महापुरे (जनसुराज्य शक्ती) यांचा समावेश आहे. आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी राजेंद्र जोशी (दै. ‘पुढारी’) यांची निवड करण्यात आली.

राजर्षी शाहू पुरस्कारासाठी जिल्हा परिषद सदस्यांमधून अकरा तर पंचायत समिती स्तरावरून चार सदस्यांचे प्रस्ताव आले होते. तालुका स्तरावरील आचार्य अत्रे उत्कृष्ट पुरस्कारासाठी 28 प्रस्ताव आले होते. पत्रकार परिषदेस माजी सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, स्वाती सासणे तसेच सदस्य पांडुरंग भांदिगरे, राजेश पाटील आदी उपस्थित होते.

कर्मचार्‍यांचे पुरस्कार आज जाहीर होणार

राजर्षी शाहू पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संयुक्तपणे जाहीर करत असतात. परंतु, आज मुख्य कार्यकारी अधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित नव्हते. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना देण्यात येणारा राजर्षी शाहू पुरस्कार प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी (दि.25) जाहीर करण्यात येणार आहेत.

भोजे यांच्या पुरस्काराची चर्चा

जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला असताना त्यांची राजर्षी शाहू पुरस्कारासाठी करण्यात आलेली निवड जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय बनला आहे.

Back to top button