घेराव मोर्चाने मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत! | पुढारी

घेराव मोर्चाने मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत!

पनवेल : पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी गुरुवारी भूमिपुत्रांनी पुकारलेल्या सिडको घेराव आंदोलनामुळे मुंबईकडे जाणार्‍या अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आणि अनेक वाहतूक मार्गही बदलले. नवी मुंबई, पनवेल शहरांना अक्षरश: छावणीचे स्वरूप प्राप्‍त झाले होते. 

आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची खबरदारी घेऊन 24 जूनला सकाळी 8  पासून रात्री 8 पर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. ठाणे बेलापूर रस्त्यावरील हलकी वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळवली आहे. कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले. मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक देखील महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे, तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईकडे वळवण्यात आली. 

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मोठा फौजफाटा तयार करण्यात आला होता. नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये 7 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात होते. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येथूनही पोलिसांची कुमक मागवण्यात आली. राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. 500 हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलन हाताळण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. नवी मुंबई परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केल्यानंतरच गाड्या सोडल्या जात होत्या. 

100 शहर बसेस रद्द

घेराव मोर्चा दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये व सार्वजनिक बस सेवांचे नुकसान होऊ नये म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या  एनएमएमसीच्या 100 बस रद्द करण्यात आल्या होत्या. एन एम एम सी च्या दररोज 250 बस नवी मुबई, मुंबई परिसरात सेवा देतात मात्र आज केवळ 150 बसेस रस्त्यावर वाहतूक करताना दिसून आल्या आहेत.

 

Back to top button