मुंबईत २०५३ जणांना टोचली बोगस लस  | पुढारी

मुंबईत २०५३ जणांना टोचली बोगस लस 

मुुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत सुमारे 2053 नागरिकांना बनावट लसीकरणाचा फटका बसल्याची कबुली महानगरपालिकेने  गुरूवारी उच्च न्यायालयात दिली. कांदीवलीतील हिरानंदानी हेरिटेज ही एकमेव सोसायटी या फसवणुकीला बळी पडलेली नाही. बोरिवली, खार आणि वर्सोवा भागातही एकाच टोळीने हे बोगस लसीकरण केल्याचे उघड झाले असून चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने खंडपीठाला देण्यात आली. त्याची दखल घेत खंडपीठाने राज्य आणि पालिका प्रशासनाला उपाययोजना सादर करण्याचे निर्देश दिले.

या संदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती  दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती  गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी  ऑनलाईन सुनावणी झाली. मागिल सुनावणीच्या वेळी न्यायालयाने  दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने  आपला सिलबंद अहवाल न्यायालयात सादर केला. एकाच टोेळीने मुंबईत वेगवेगळ्या नऊ ठिकाणी लसीकरणाची शिबिरे घेतली.  कांदिवली, बोरिवली, वर्सोवा, खार अशा चार ठिकाणी एफआयआर नोंदवले आहेत.  त्या पैकी एक शिबिर बोरिवलीत ज्या आदित्य महाविद्यालयात घेतल्याचे उघड  झाले तेथील आशिष मिश्रा यांना बोरिवलीच्या एफआयआरमध्ये आरोपी करण्यात आले  आहे. या संपूर्ण बोगस लस प्रकरणाचा सूत्रधार डॉ. मनीष त्रिपाठी हा फरार आहे. 

सद्यस्थितीला प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. हे  प्रकरण वेळकाढूपणाचे नाही, त्याचे गांभीर्य ओळखा अशा शब्दात खंडपीठाने राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाचे कान उपटले. हे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबद्दल स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे  निर्देश देत सुनावणी 29 जूनपर्यंत तहकूब केली.

 

Back to top button