महिनाभरात कोरोनाची तिसरी लाट ! | पुढारी

महिनाभरात कोरोनाची तिसरी लाट !

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

डेल्टा, डेल्टा प्लस या कोव्हिडच्या नव्या व्हेरियंट्सचा प्रसार होत असून 4 ते 6 आठवड्यांत महाराष्ट्राच्या मोठ्या भागात अधिक घातक रूपात कोरोनाची तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही लाट रोखण्यासाठीच सामान्यतः आणखी कठोर बंधने लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी नव्या आदेशात म्हटले आहे.

डेल्टा, डेल्टा प्लस विषाणूच्या म्युटेशन्स आणि त्यात सातत्याने होत असलेली उत्क्रांती पाहता येत्या काळात कल्पनेपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. डेल्टा प्लस हा व्हेरियंट चिंतेचा विषय (व्हेरियंट ऑफ कन्सर्न – व्हीओसी) आहे. वाढती संक्रमणशीलता, फुप्फुसाच्या पेशींना मजबुतीने चिकटण्याची क्षमता, मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या प्रतिसादात संभाव्य घट करत असल्याचे खछड-उजॠ या कोव्हिड – 19 च्या संदर्भात संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी स्थापन केलेल्या पथकाने म्हटले आहे. रत्नागिरी, जळगाव आणि इतर जिल्ह्यांत हा विषाणू सापडल्यामुळे प्रसार रोखण्यासाठी निर्बंध कडक करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. 

तिसर्‍या लाटेत 50 लाख रुग्ण? 

तिसर्‍या लाटेत राज्यातील किमान 50 लाख नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याचा अंदाज केंद्रीय यंत्रणांसह राज्याच्या आरोग्य विभागाने वर्तविला आहे. यात 10 टक्के म्हणजेच 5 लाख बालके व मुले असतील, अशी माहिती अन्न व प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी दिली. तर, दरदिवशी 70 ते 80 हजार नवे रुग्णसंख्या आढळू शकेल, तर सक्रिय रुग्णांची संख्या 8 लाखांपेक्षा अधिक असेल असा अंदाज टास्क फोर्सने बांधला आहे. अर्थातच केंद्राच्या आयसीएमआरने यापेक्षा अधिक सक्रिय रुग्णांची संख्या असू शकते अशी भीती व्यक्त केली आहे.

राज्यातील दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर राज्य सरकारने लावलेले कडक निर्बंध उठवून पाच स्तर (लेव्हल्स) ठरवले होते. मागील तीन आठवड्यांपासून 36 जिल्ह्यांत तेथील पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या यानुसार हे टप्पे निश्चित करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनांना दिले होते. यामुळे नवी दैनंदिन रुग्णसंख्या 4 ते 5 हजारांत येण्याची अपेक्षा असताना सध्या रोज 8 ते 10 हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. ही स्थिती चिंताजनक असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. 

एकीकडे रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आणि त्यातच डेल्टा व डेल्टा प्लस या धोकादायक व्हेरियंटचे 21 हून अधिक रुग्ण आढळले. डेल्टा प्लसचे देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रत्नागिरीतील एका महिलेचा डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गाने 13 जून रोजीच मृत्यू झाला. महाराष्ट्रातील हा पहिला बळी होय. डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण ब्रिटन, अमेरिकेसह 12 देशात आढळून आले आहेत. त्यामुळे देश- विदेशातून भारतात येणार्‍या प्रवाशांकडूनही संसर्ग पसरण्याची भीती आहे. 

लसीकरणात महाराष्ट्र अव्वल

कोरोनाविरोधी लसीकरण सुरू झाल्यापासून ते शुक्रवारी दुपारपर्यंत देशात 30 कोटी 80 लाख 89 हजार 48 नागरिकांना डोस देण्यात आला आहे. लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात 3 कोटी 27 हजार 217 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.  उत्तर प्रदेश (2 कोटी 95 लाख 98 हजार) दुसर्‍या स्थानी, तर गुजरात (2 कोटी 42 लाख 23 हजार) तिसर्‍या क्रमांकावर आहे.

शुक्रवारी महाराष्ट्रात 3 लाख  81 हजार 965 लोकांचे लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 43 लाख 32 हजार 111 लोकांना पहिला डोस देण्यात आला असून 58 लाख 3 हजार 396 लोकांना दुसरा डोस दिला गेला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

लसीकरणामध्ये राज्यातील पुरुष पुढे आहेत. आतापर्यंत 1 कोटी 63 लाख 41 हजार 947 पुरुषांचे,  तर 1 कोटी 37 लाख 89 हजार 539 महिलांचे लसीकरण झाले आहे. 

Back to top button