ऑनलाईन शिक्षणाने मुलांच्या डोळ्यांवर ताण | पुढारी

ऑनलाईन शिक्षणाने मुलांच्या डोळ्यांवर ताण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणाने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा एका सर्वेक्षणात केलेला आहे. सर्वेक्षणानुसार, ऑनलाईन शिक्षणात वर्ग संपेपर्यंत 53 टक्के विद्यार्थी थकत असून 41 टक्के विद्यार्थ्यांनी डोळ्यांवर ताण येत आहे.

विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन वाईट परिणाम होत असल्याचे गोदरेज अ‍ॅण्ड बॉयसच्या सर्वेक्षणात उघडकीस आले आहे. ‘घरून शिक्षण घेत असताना मुलांची घ्यायची काळजी’ या विषयावर एरगॉनॉमिक्स रिसर्च सेल यांनी अभ्यास करत एक वेबिनार घेतले. त्यासाठी 3 ते 15 या वयोगटातील 350 शालेय विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यात आला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद होण्याआधीच्या तुलनेत विद्यार्थी 2 ते 3 तास जास्त वेळ गॅजेटवर असतात. दिवसाला कमीत कमी 4 ते 6 तास विद्यार्थी गॅजेटमध्ये गुंतलेले असतात. 

वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. 52 टक्के विद्यार्थ्यांचे दररोज, 36 टक्के मुलांचे आठवड्यात चार वेळा ऑनलाईन वर्ग भरतात. पैकी 41 टक्के विद्यार्थ्यांनी डोळ्यावर ताण येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

घरातून शाळा शिकतानाची मुलांची वर्तणूक, बसण्याची पद्धत, मुक्‍त शिक्षण घेत असताना घ्यायची काळजी याबाबतही आवाहन केले आहे. ऑनलाईन शिक्षण जास्त काळ सुरु आहे. अशावेळी मधल्या सुट्टीचे महत्व आणि जुनी चांगली पेपर व पेन्सिल पद्धत यांच्याविषयी भाष्य केले. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन यांचे मिश्रण करून अध्ययन करता येईल का? हेही पहावे लागेल. दीर्घकाळ चुकीच्या पद्धतीने अभ्यासाला बसल्यामुळे पाठीच्या मणक्यांचे आजार उद्भवू शकतात. मुलांना कशाप्रकारे योग्य वातावरण तयार करून देता येईल? यासाठीचे साधे मार्ग डॉ. रीना वालेचा यांनी सांगितले. 

 

Back to top button