‘कोरोना सिरो सर्व्हेलन्स’ : 514 रक्‍ताचे नमुने घेतले | पुढारी

‘कोरोना सिरो सर्व्हेलन्स’ : 514 रक्‍ताचे नमुने घेतले

सांगली : पुढारी वृत्तसेवा

‘कोरोना सिरो सर्व्हेलन्स’साठी जिल्ह्यातून 514 व्यक्‍तींंचे रक्‍ताचे नुमने तपासणीसाठी घेतले आहेत. ‘आयसीएमआर’च्या चेन्नई येथील प्रयोगशाळेत रक्‍ताच्या नमुन्यातील ‘कोरोना’च्या अँटीबॉडीज तपासल्या जाणार आहेत. समाजात प्रतिकारशक्‍ती किती प्रमाणात तयार झाली आहे, याची माहिती या तपासणीतून समोर येणार आहे. 

कोरोना सिरो 

सर्व्हेलन्ससाठी ‘आयसीएमआर’चे पथक शुक्रवारी सांगली जिल्ह्यात आलेे. पथक प्रमुख डॉ. शबाना खान आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे कन्सलटंट डॉ. हेमंत खैरनारे, डॉ. अविनाश जाधव डॉ. सुहासिनी कारे हे या सिरो सर्व्हेलन्स मोहिमेच्या पर्यवेक्षणासाठी आले होते. त्यांच्या समवेत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी होत्या. 

प्रभाग 9 व 20 मधून 80 नमुने

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 आणि 20 मधून प्रत्येकी 40 असे एकूण 80 व्यक्तींचे रक्‍तनमुने तपासणीसाठी घेतले आहेत. रक्‍तनमुने घेताना वयोगटनिहाय घेण्यात आले आहेत. 

8 गावांमधूनही घेतले नमुने

ताकारी (ता. वाळवा), कुंडल (ता. पलूस), नांद्रे (ता. मिरज), शिवणी (ता. कडेगाव), येळावी (ता. तासगाव), आगळगाव (ता. कवठेमहांकाळ), हळ्ळी (ता. जत) आणि विटा नगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 8 या एकूण आठ क्‍लस्टरमधून 330  व्यक्तींचे रक्‍तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले. 

हेल्थकेअर वर्कर्सचेही रक्‍तनमुने

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचार्‍यांचे 104 रक्‍तनमुने तपासणीसाठी घेतले आहेत. जिल्ह्यातून घेतलेले एकूण 514  रक्‍तनमुने जिल्हा परिषदेत जमा केलेे आहेत. ते तपासणीसाठी चेन्नई येथील प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत. 

सर्व्हेलन्सची चौथी फेरी झाली; रिपोर्टकडे लक्ष

महापालिका क्षेत्र व जिल्ह्याच्या उर्वरितभागात सिरो सर्व्हेलन्सची ही चौथी फेरी आहे. महापालिका क्षेत्रात पहिल्या फेरीवेळी 0.73 टक्के व्यक्तींमध्ये, दुसर्‍या फेरीवेळी 6.6 टक्के, तर तिसर्‍या फेरीवेळी 24.5 टक्के व्यक्तींमध्ये ‘कोरोना’च्या अँटीबॉडीज तयार झाल्याचे तपासणीतून समोर आले. आता चौथ्या फेरीच्या तपासणी रिपोर्टकडे लक्ष लागले आहे. 

Back to top button