आरटीपीसीआरनंतरच कर्नाटकात प्रवेश | पुढारी | पुढारी

आरटीपीसीआरनंतरच कर्नाटकात प्रवेश | पुढारी

बेळगाव / कोगनोळी : पुुढारी वृत्तसेवा 

महाराष्ट्रामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कोगनोळी तपासणी नाक्याला शनिवारी भेट देऊन कडक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. आरटीपीसीआर अहवाल किंवा कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा दाखला असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र, गोव्याहून येणार्‍या प्रवाशांना खबरदारी घ्यावी लागणार.

बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. पुन्हा कर्नाटकाच्या शेजारील राज्यांमधून कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी नाक्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. राज्यातील कोरोनाची संख्या घटवण्याची जबाबदारी नागरिकांची असून नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर न पडता स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत कोरोनाला हद्दपार करावे, असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांकडे आरटीपीसीआर अहवाल व कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्याचा दाखला असल्याशिवाय प्रवेश देऊ नये, अशा सूचना केल्या. जिल्हाधिकार्‍यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर कोगनोळी तपासणी नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

गेल्या दीड दोन महिन्यांपासून कोगनोळी तपासणी नाक्यांवर महसूल आरोग्य शैक्षणिक विभागातील वेगवेगळे कर्मचारी कार्यरत असून शनिवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासमवेत चिकोडी प्रांताधिकारी युकेशकुमार, निपाणी तहसीलदार प्रकाश गायकवाड, निपाणी मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी, शहर पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, निपाणी नगरपालिका आयुक्त महावीर बोरण्णावर, निपाणी सर्कल अजित वंजोळे, कोगनोळी तलाठी के. एल. पुजारी, एएसआय एस. ए. टोलगी, विजय पाटील, एस. आय. कंभार  आदी उपस्थित होते.

मृतांचा आकडा वाढला; 125 कोरोनामुक्‍त

बेळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत असला तरी मृतांचा आकडा मात्र शनिवारी वाढला होता. तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला असून, 125 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जिल्ह्यात 115 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये बेळगाव तालुक्यातील 48 जणांना लागण झाली आहे. ग्रामीण भागात 15 जणांना लागण झाली आहे. जिल्ह्यात सध्या 1872 जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या सात दिवसांत पॉझिटिव्हिटी दर 3.14 टक्के आहे. दिवसभरात 3562 जणांची तपासणी करण्यात आली.

कोरोना संसर्ग कमी होत असताना मृतांचा आकडा मात्र वाढत असल्यामुळे आरोग्य खात्याने चिंता व्यक्त केली आहे. शनिवारी दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 765 वर पोचला आहे.

आजही दुकाने 2 पर्यंत सुरू

वीकेंड लॉकडाऊनमुळे सोमवारी पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, संचारबंदी काळात सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार रविवारीही दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवता येतील. अन्‍नपदार्थांशी संबंधित दुकाने, फळे आणि भाजीपाला, मटण आणि मासळीची दुकाने तसेच दूध डेअरी आणि दूध विक्री केंद्रांना परवानगी  आहे. याव्यतिरिक्‍त अन्य सर्व दुकाने बंद राहतील. 

Back to top button