साद वर्षा पर्यटनाची; बिघडली वाट पर्यटकांची  | पुढारी

साद वर्षा पर्यटनाची; बिघडली वाट पर्यटकांची 

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पहिल्या  लाटेमुळे  गाळात रुतलेला पर्यटन उद्योग दुसर्‍या लाटेमुळे आणखी खोलात रूतला  आहे. गेल्या दीड वर्षापासून पर्यटन स्थळावर शुकशुकाट असून तेथील पर्यटनावर आधारित व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिक हताश झाले आहेत. सध्या बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आटोक्यात असले तरी वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची वाट बिघडली आहे.

नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक बलस्थानांना लोकप्रियता मिळवून देण्यासह रोजगारनिर्मिती ही पर्यटन उद्योगाची जमेची बाजू आहे. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर विस्कळीत झालेला पर्यटन व्यवसाय अजून सावरलेला नाही. धकाधकीच्या आणि ताणतणावातून मनशांती मिळवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवणे, ही अनेकजणांची गरज बनली आहे. परंतु बाहेर अजूनही धोका संपलेला नसल्याने पर्यटनाकडे पाठ फिरवली जात आहे.

जिल्ह्यातील गोकाक, गोडचिनमलकी धबधबा, दूधसागर, पश्‍चिम भागातील सुरल, कणकुंबी आदी भागात वर्षा पर्यटनासाठी जाणार्‍या नागरिकांमध्ये अजूनही भीती आहे. बेळगावचे तरूण आंबोलीसह चंदगड तालुक्यातील तिलारी, किटवाड, सुंडी येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जातात. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ही पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. बेळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर जायचे असेल तर पर्यटनस्थळी प्रशासनातर्फे कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. मात्र बससेवा किंवा खासगी वाहतूक नसल्याने उपलब्ध नसल्याने पर्यटकांना नियोजित स्थळी जाता येत नाही. याउलट महाराष्ट्रातील पर्यटनस्थळावर प्रथम पर्यटकांची अँटिजेन तपासणी केली जाते. अहवाल निगेटिव्ह असेल तरच पर्यटनस्थळ पाहण्यासाठी  संमती दिली जाते. प्रशासनाच्या या नियमावलीमुळे पर्यटकांनी वर्षा पर्यटनच नको, असे म्हणत पाठ फिरवली आहे. जून महिन्याच्या अखेरीस सृष्टीचे रूप साद घालत असताना पर्यटनस्थळावर शांतता दिसत आहे.

सलग दोन हंगाम वाया गेल्याने पर्यटनावर विसंबून असणार्‍या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. शनिवार आणि रविवारी बेळगावात वीकेंड लॉकडाउन असताना काही अतिउत्साही तरूण राज्य सीमा ओलांडून महाराष्ट्रात आंबोली, तिलारीकडे जात आहेत. मात्र काहीजण बाची किंवा शिनोळी येथे पोलिसांकडून अडवणूक होताच माघारी फिरत आहेत. काहीजण अन्य मार्गाने नियोजित स्थळी जात असले तरी तेथील कडक पहारा आणि नियमावली पाहून पर्यटनस्थळ न पाहताच मागे फिरत आहेत.

बेळगावचे पर्यटक वर्षा पर्यटनासाठी गोव्यातही जात असतात. यंदा मात्र तेथील प्रवेशाची नियमावली पाहून गोव्यात न जाणेच पसंत केले जात आहे. सध्या काही टूर्स कंपन्या उत्तर भारत, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, काशी, कन्याकुमारी असे पर्याय देत आहेत. मात्र यालाही प्रतिसाद मिळताना दिसत नाही.विदेशातील सहली सध्या बंदच असून टूर्स कंपन्यांच्या  कर्मचार्‍यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवले आहे. तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना पर्यटन सुरळीतपणे कधी सुरू होणार, याची उत्सुकता आहे. 

कोरोनाची भीती अन् पोलिसांची धास्ती

पर्यटनासाठी घराबाहेर पडताना पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोणत्याही पर्यटनस्थळी जायचे तर  कोरोनाची भीती आणि नियोजित ठिकाण पाहून घरी परतेपर्यंत पोलिसांची धास्ती  आहे. याशिवाय महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने धोका कशाला पत्करायचा, या मानसिकतेतून  पर्यटनाला बगल दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यासह आजूबाजूच्या पर्यटन केंद्रावर हंगाम असूनही पर्यटकांचे दर्शन होताना दिसत नाही.  

 

Back to top button