एका भावाला वाचवण्यासाठी तीन भावांनी घेतली कृष्णा नदीत उडी, पण चौघेही बुडाले | पुढारी

एका भावाला वाचवण्यासाठी तीन भावांनी घेतली कृष्णा नदीत उडी, पण चौघेही बुडाले

संबरगी; प्रतिनिधी : नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेले चौघे भाऊ सोमवारी नदीत बुडाले. मात्र दुर्घटनेेचे कारण असे की मधला भाऊ तोल जाऊन नदीच्या पाण्यात बुडू लागल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी त्याच्या तीन भावांनी नदीत उडी घेतली. तथापि, कुणालाही पोहता येत नसल्याने चौघेही बुडाले. मात्र पोहता येत नसतानाही भावाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेऊन इतर भावांनी आपले बंधूप्रेम जगाला दाखवून दिले आहे. 

अथणी तालुक्यातील हल्याळ गावात गुरुवारी उरुस आहे. त्यानिमित्त ग्रामस्थांनी घरातील सारे कपडे आणि बिछानेही धुण्यास काढले आहेत. कपडे जास्त असल्याने जवळच्या कृष्णा नदीवर महिलांऐवजी पुरुष मंडळीच गेली होती. प्रथम अंथरुण धूत असताना चौघांपैकी मधला भाऊ सदाशिव बनसोडे (वय 24) याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी मोठे भाऊ परशराम यांनी नदीत उडी घेतली. पण तेही बुडाले. त्या दोघांना वाचवण्यासाठी दर्‍याप्पा बनसोडे (22) याने नदीत उडी घेऊन दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण तोही बुडाला. त्यानतंर कनिष्ठ भाऊ शंकर बनसोडे (18) यानेही नदीत उडी घेतली. पण त्यालाही पोहता येत नव्हते. त्यामुळे तोही बुडाला.

आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने कृष्णा नदी भरून वाहत आहे. त्यामुळे पाण्याला वेगही आहे. परिणामी बुडालेले चौघेही भाऊ घटनास्थळापासून लांब वाहत गेले असण्याची शक्यता आहे. 

घटनेची माहिती बनसोडे कुटुंबीयांनी  घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती अथणी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी डीवायएसपी एस. व्ही. गिरीश, सीपीआय शंकरगौडा बसगौडर, पीएसआय कुमार हडकर, तहसीलदार दुंडाप्पा कोमर यांनी धाव घेतली.

काही वेळानंतर अथणी अग्निशामक दल, एनडीआरएफची तुकडी, तसेच स्थानिक मच्छिमार यांनी शोध सुरू केला. पण कुणाचाही थांगपत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत  शोध सुरू होता. परिसरातील दरूर, हल्याळ, औरखोड या गावांतील येथील पट्टीचे पोहणारे त्यांचा शोध घेत आहेत. नदीकाठी तालुका प्रशासन ठाण मांडून आहे. चौघांचा शोध रात्री उशिरापर्यंत लागण्याची शक्यता आहे. वाहून गेलेल्यांपैकी दोघे विवाहित आहेत. दोघे  अविवाहित आहेत.  त्यांच्या मागे आई-वडील, दोन भावांच्या पत्नी, तीन मुले, तीन मुली आहेत. ऐन सणात ही दुर्घटना घडली आहे. 

Back to top button