...तर रेजिनाल्ड यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमा | पुढारी

...तर रेजिनाल्ड यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

‘आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी आपल्यावर जो पक्षनिधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे, तो  त्यांच्याकडे काही पुरावे असल्याशिवाय केलेला नसावा. म्हणूनच त्यांच्याच नेतृत्वाखाली तपास समिती नेमावी, अशी मागणी आपण गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्याकडे करणार आहोत’, अशी माहिती गिरीश चोडणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेस विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि इतर  उपस्थित होते.

चोडणकर म्हणाले की, आमदार रेजिनाल्ड हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या आरोपाकडे आपण गांभीर्याने पाहत आहोत. आपण प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कामामध्ये पारदर्शकता आणली आहे. दर महिन्याला आपण पक्षाच्या खर्चाचा अहवाल कार्यालयात सादर करीत आहे. त्यामुळे रेजिनाल्ड यांच्याकडे पुरावे असल्याशिवाय ते आरोप करणार नाहीत. त्यामुळेच त्यांच्या अध्यक्षतेखालीच तपास समिती नेमली जावी, अशी आपली मागणी आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनीही प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी पक्ष संपविल्याचा आरोप केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर चोडणकर म्हणाले की, पक्ष रसातळाला चालला की कोणी त्याचे नेतृत्व करीत नाहीत. पण, पक्ष सुस्थितीत आल्यानंतर सर्वजण नेतृत्व करण्यासाठी पुढे येतात. पक्ष जर एवढा दुर्बल झाला असेल तर इतर पक्ष काँग्रेसकडे आघाडीसाठी हात का करीत आहेत, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस पक्षाची गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती होणार का, याविषयी विचारणा केल्यानंतर कामत यांनी त्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, असे सांगितले.

पेट्रोल दरवाढीविरोधात राज्यभर आंदोलन

पेट्रोल दरवाढीविरोधात देशभर काँग्रेस भाजप सरकारविरोधात 30 दिवस आंदोलन करणार आहे. राज्यातही याविषयी आंदोलन होणार आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांना पक्षाच्या वतीने संवेदनापत्र दिले जाणार आहे. पक्षाचे कोव्हिडयोद्धे दररोज दहा ते पंधरा कुटुंबांची भेट घेणार आहेत. या आंदोलनामध्ये प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने विविध ठिकाणी निदर्शने होतील. त्यानंतर 10 जुलै रोजी मडगाव येथे, तर 16 जुलै रोजी पणजीत सायकल यात्रा काढली जाईल. त्यानंतर पक्षाच्या सर्व नेत्यांच्या सहभागात एक रॅली काढली जाईल. त्यानंतर गटस्तरावर दरवाढीविरोधात आंदोलन केले जाईल.

 

Back to top button