आषाढी वारी काळात पंढरपुरात संचारबंदी | पुढारी

आषाढी वारी काळात पंढरपुरात संचारबंदी

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

आषाढी वारीच्या कालावधीत पंढरपूर शहरासह परिसरातील दहा गावांत सात दिवसांची कडक संचारबंदी व नाकाबंदी करण्यात येणार आहे. कलम 144 लागू होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पोलिस विभागाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा येत्या 20 जुलै रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आषाढी सोहळा शासनाच्या वतीने प्रातिनिधिक व मर्यादित स्वरुपात साजरा होत असला तरी या काळात परवानगीधारक भाविकांव्यतिरिक्त कोणीही पंढरपुरात येऊ नये म्हणून त्रिस्तरीय नाकाबंदीसह 17 ते 25 जुलैदरम्यान पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावांत 7 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात यावी, असा प्रस्ताव पोलिस विभागाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे यंदाही भाविकांना आषाढी यात्रेत विठुरायाच्या दर्शनाला मुकावे लागणार आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या पंढरपूर येथे 22 रोजी श्री विठ्ठल पोलिस सह. गृहनिर्माण सोसायटी पंढरपूरच्या भूमिपूजनासाठी आल्या होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी  त्यांनी पत्रकारांनी माहिती दिली. 

कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या येथील श्री विठ्ठल-रूक्मिणीची वर्षभरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आषाढी यात्रा प्रसिध्द आहे. आषाढीला राज्यभरातून तसेच कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू आदी भागांतून 12 ते 16 लाख भाविक येत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या धास्तीने  यात्रा केवळ परंपरा जपण्यासाठी प्रातिनिधीक व मर्यादित स्वरुपात साजर्‍या केल्या जात आहेत. 

मागील वर्षीच्या आषाढी यात्रेलादेखील संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे मानाच्या दहा पालख्या व त्या पालख्यांसमवेत परवानगी दिलेल्या विश्‍वस्त, महाराज, भाविक यांनाच पंढरपुरात येण्याची परवानगी दिली होती. पंढरपूर शहरालगतच्या गोपाळपूर, लक्ष्मीटाकळी, वाखरी, कौठाळी, भटुंबरे, शेगावदुमाला, चिंचोली, भोसे, शिरढोण, कोर्टी आदी गावांतही संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्याच पध्दतीने याही आषाढी यात्रेत  17 जुलै रोजी रात्री 12 ते ते 25 जुलै रोजी रात्री 12 यादरम्यान 7 दिवसांची पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावांत कडक संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. 

त्याचबरोबर चंद्रभागेच स्नान करण्यासाठी भाविक व नागरिकांनी गर्दी करु नये म्हणून कलम 144 लागू करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांनाही घराबाहेर पडता येणार नाही. पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी लागू करण्यात यावी, असा प्रस्ताव पोलिस विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत शासनाकडून लवकरच आदेश पारित होतील, असे जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

• आषाढी यात्रा एकादशी सोहळा 20 जुलै रोजी

• पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावांत संचारबंदी

• चंद्रभागा वाळवंट व प्रदक्षिणामार्गावर कलम 144 

• सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी

• मानाच्या 10 पालख्या, परवानगीधारकांनाच प्रवेश

• जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर

• यंदाही भाविक विठुरायाच्या दर्शनाला मुकणार

Back to top button