पेणमधील गणेशमूर्ती निघाल्या बाजारपेठेत | पुढारी | पुढारी

पेणमधील गणेशमूर्ती निघाल्या बाजारपेठेत | पुढारी

अलिबाग : जयंत धुळप

गतवर्षी लॉकडाऊन आणि कोकण रेल्वे बंद राहिल्याने मर्यादित प्रमाणातच गणेशमूर्ती पेेणमधून देशभरात वितरीत झाल्या होत्या. यंदा मात्र दिलासादायक चित्र आहे. मागणी  वाढल्याने काही मूर्ती आताच रवाना झाल्या आहेत. पेण शहर व परिसरात दरवर्षी 40 लाख गणेशमूर्ती तयार करण्यात येतात. गेल्यावर्षी कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर अनेक मूर्ती बाहेर जाऊ शकल्या नाहीत. त्या मूर्तीकारांकडे शिल्लक राहिल्या. परिणामी यंदा मूर्तीकारांनी आपल्याकडील मूर्तींची संख्या वाढविलेली नाही मात्र मागणी वाढलेली आहे. 

अनेक व्यापार्‍यांनी मूर्तींची मोठी ऑर्डर नोंदविली आहे. त्याच बरोबर मागणी देखील वाढली आहे.गणेशमूर्ती मोठ्या शहरांतील बाजारपेठेत रवाना देखील होत आहेत. परिणामी यंदा गणेशमूर्ती कदाचित कमी पडतील अशी  शक्यता वर्तविण्यात आली आहे.  नेमक्या किती मूर्ती कमी पडतील यांचा कोणताही अंदाज नसल्याचे  पेण गणेशमूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी सांगितले.  दरम्यान, गेल्यावर्षी लागू करण्यात आलेल्या कोरोनाच्या  निर्बंधांमुळे वाहतूक व बाजारपेठेवरील निर्बंध कडक होते. त्या तुलनेत ते यंदा काही प्रमाणात कमी झाले आहेत.नेहमीचे व्यापारी आणि स्थानिक खरेदीदार यांचा अंदाज घेवूनच मूर्ती करण्यात आल्या असल्याचे  पेण मधील ज्येष्ठ गणेशमूर्तीकार दीपक समेळ यांनी सागितले. 

10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघर गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यासाठी पेण शहर व परिसरातील गावांतून आता गणेशमूर्ती मुंबई, पुणे, नाशिक आदी मोठ्या शहरांतील बाजारपेठेत रवाना होऊ लागले  आहेत. व्यापार्‍यांनी येथून गणेशमूर्ती घेऊ न जाण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान आतापर्यंत 4 लाख गणेशमूर्ती कंटेनर्समधून जेएनपीटी बंदरातून बोटीने अमेरिका, फ्रान्स, मलेशिया व काही आखाती देशात रवाना झाल्या असल्याचे समेळ यांनी सांगितले.

कोकण रेल्वेची सेवा गतवर्षी बंद होती, त्यामुळे गेल्यावर्षी कोकणात पेणच्या गणेशमूर्ती जाऊ शकल्या नव्हत्या. मात्र, यंदा काही प्रमाणात जात आहेत. मोठ्या बाजारपेठांतील व्यापारी देखील गेल्यावर्षी आले नव्हते, मात्र यंदा ते आले असून  मुंबई, पुणे, नाशिक व राज्यातील अन्य शहरात तसेच गुजरातमध्ये गणेशमूर्ती पाठविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळत असल्याचे समेळ यांनी सांगितले.

सार्वजनिक गणपतींच्या मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आल्याने, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी दिसून येत आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे अनेक सार्वजनिक गणेशमंडळांनी गणेशोत्सव रद्द केल्याने काही गणेशमूर्ती शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे मुर्तीकारांना आर्थिक फटका सोसावा लागला होता. त्यामुळे यंदा लहान मूर्तींचीच मागणी मंडळाकडून होईल, अशी शक्यता  समेळ  यांनी व्यक्त केली  आहे.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे यंदा रस्त्याची विशेषतः पेण मुंबई महामार्गाची परिस्थिती चांगली असल्याने वाहतुकीदरम्यानचे नुकसान टळणार आहे.     पेण व परिसरातील गावांतील सुमारे तीन हजार गणेश कार्यशाळांमधून आता मूर्ती रंगकामाचा अखेरचा टप्पा सुरु आहे. या मूर्ती बहुतांश करून स्थानिक व जिल्ह्यात जाणार्‍या असतात. परदेशी व परगावी जाणार्‍या मूर्ती  गणेशोत्सवाच्या सुमारे तीन महिने आधीपासूनच रवाना होत असतात. 

 

Back to top button