एसटी महागणार? | पुढारी | पुढारी

एसटी महागणार? | पुढारी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

एसटीचे आर्थिक गणित  कोरोनामुळे कोलमडले आहे. त्यातच  डिझेलचे दर वाढल्याने एसटीवर महिन्याला सुमारे 120 ते 140 कोटी रुपयांचा अतिरिक्‍त आर्थिक भार पडणार आहे. यामुळे महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.त्यामुळे सामान्यांचा एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. यापूर्वी जून 2018 मध्ये महामंडळाची 18 टक्के भाडेवाढ झाली होती. 

महामंडळाच्या 15 ते 16 हजार बस डिझेलवर धावतात. एसटीची राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू असते. त्यावेळी दिवसाला एसटीला 12 लाख 500 लिटर डिझेल लागते. सध्या महामंडळाच्या दहा हजार बस धावत आहेत. त्यासाठी 8 लाख लिटर डिझेल दिवसाला लागते. एसटीच्या एकूण महसुलाच्या 38 टक्के म्हणजेच 3 ते 4 हजार कोटी रुपये फक्‍त इंधनावर खर्च होतात. मार्च 2020 मध्ये 67 रुपये लिटरने मिळणारे डिझेल आता 91 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.त्यामुळे  एसटीने आर्थिक तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.

सलग दुसर्‍या दिवशी गुरुवारी पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाली. देशात पेट्रोल दरात 35 पैसे, तर डिझेलच्या दरात 9 पैशांनी वाढ नोंदवण्यात आली. नव्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीतील पेट्रोल आणि डिझेलचे प्रतिलिटर दर  100.56 रु. आणि 89.62 रु. आहेत. मुंबईत 106.59 आणि 97.18, कोलकातामध्ये 100.62 आणि 92.65 तर चेन्‍नईत 101.37 आणि 94.15 रुपये दर आहेत.  

Back to top button