सातारा जिल्ह्यात कोरोना निर्बंध ‘जैसे थे’ राहणार | पुढारी

सातारा जिल्ह्यात कोरोना निर्बंध ‘जैसे थे’ राहणार

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याचे  चित्र आहे. गेल्या सहा दिवसांचा कोरोना संसर्गाचा आरटीपीसीआर अहवाल 13 टक्क्यांवर पोहोचला आहे. आठ दिवसांत त्यामध्ये साधारण एक ते दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना निर्बंध ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी शुक्रवारी निर्णय घेणार आहेत.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. जिल्ह्यात दररोज संशयितांच्या 10 हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. बुधवारी हजारावर लोक कोरोना बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. रुग्णवाढ पुन्हा धडकी भरवणारी ठरली आहे. संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील व्यवहारांवरही मर्यादा आणल्या जात आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार  आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आढळणार्‍या रुग्णसंख्येवरुन पॉझिटीव्हीटी रेट काढला जात आहे. गेल्या सहा दिवसांची आकडेवारी पाहिली असता सर्वाधिक बाधितांचे प्रमाण दि. 6 रोजी राहिले. या दिवशी आरटीपीसीआर रेट 16.49 टक्के नोंदवण्यात आला. गेल्या सहा दिवसांचा आरटी-पीसीआर पॉझिटीव्हीटी रेट 13.18 टक्के इतका येत आहे. गुरुवार एका दिवसाचा अंदाजे 13.50 इतका पॉझिटीव्हीटी रेट ग्रहित धरला तर गेल्या सात दिवसांचा एकूण आरटीपीसीआर पॉझिटीव्हीटी रेट  साधारण 13.23 टक्के इतका येवू शकतो. आठ दिवसांपूर्वी हा पॉझिटीव्हीटी रेट 11.95 टक्के इतका होता. त्यामध्ये साधारण एक ते दीड टक्के वाढ होवू शकते. आरटीपीसीआरचा दर 10 टक्क्यांच्यावर असेल तर संबंधित जिल्ह्याचा समावेश चौथ्या स्तरात केला जातो. सातारा जिल्हा गेल्या आठवड्यापासून चौथ्या स्तरात आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने निर्बंध जैसे थे राहणार असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, गेल्या सात दिवसांचा आरटीपीसीआर पॉझिटीव्हीटी अहवाल विचारात घेवून जिल्हाधिकारी शेखर सिंह शुक्रवारी होणार्‍या बैठकीत  निर्बंधासंदर्भात निर्णय घेणार आहेत. 

वेगळ्या सवलती देता येणार नाहीत : जिल्हाधिकारी 

महाबळेश्वरचे निर्बंध शिथिल करणार का? या प्रश्नावर  बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, निर्बंधासंदर्भात  राज्य शासनाचा 4 जूनचा जो आदेश आहे त्याप्रमाणे 1, 2, 3, 4 असे टप्पे ठरवून दिले आहेत. जिल्ह्यात महाबळेश्वर किंवा दुसरा तालुका असो त्यांना वेगळ्या सवलती आता तरी देता येणार नाहीत. त्याबाबत शासनाने वेगळा निर्णय घेतला तरच तसा विचार करता येईल. महाबळेश्वरमध्ये चौथ्या टप्प्याप्रमाणे शनिवार व रविवारी पूर्णवेळ संचारबंदी आहे. पर्यटक व नागरिकांना संचारबंदीचा आदेश 100 टक्के पाळावयाचा आहे.

आरटीपीसीआर पॉझिटिव्हीटी

2 जुलै    13.39 टक्के

3 जुलै    10.02 टक्के

4 जुलै    10.78 टक्के

5 जुलै    13.84 टक्के

6 जुलै    16.49 टक्के

7 जुलै    14.61 टक्के

Back to top button