खा. रणजितसिंह निंबाळकरांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान? | पुढारी

खा. रणजितसिंह निंबाळकरांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान?

फलटण : पुढारी वृत्तसेवा

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. फलटणचा पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री पदाच्या रुपाने सन्मान होणार  असल्याच्या चर्चेने तालुक्यासह माढा मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. बारामतीकडे जाणारे पाणी अडवण्याची धमक दाखवल्याबद्दल, कट्टर शरद पवार विरोधक अशी प्रतिमा झाल्याने बक्षीस म्हणून व माढ्यातील चमत्काराची लॉटरी म्हणून रणजितसिंहांना मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे प्राबल्य होते. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो खा. शरद पवारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गत लोकसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रीय काँग्रेसचे तत्कालीन सातारा जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपत घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात लोकसभेच्या रिंगणात उतरवले. खा. निंबाळकर यांच्या रुपाने माढा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. खासदार झाल्यापासून खा. निंबाळकर यांनी पाण्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. विशेषत: बारामतीकडे जाणारे पाणी अडवण्यात रणजितसिंहांनी दाखवलेली आक्रमकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जावून पोहोचली होती. राष्ट्रवादी विरोधात रान उठवत पुन्हा एकदा पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत आ. समाधान अवताडे यांना निवडून आणत पुन्हा एकदा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपचे वर्चस्व सिद्ध केले आहे.

माढा लोकसभा निवडणुकीच्या काळापासून खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपच्या गोटातील एक प्रमुख नेते म्हणून पुढे आले. खा. रणजितसिंह यांंनी केंद्र सरकारच्या विविध कमिटीच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याने त्यांना अनुभव ही चांंगला आला आहे. तसेच भाजपचे प्रमुख विरोधक ठरलेल्या शिवसेनेला चेकमेट व राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे. पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांनी खा. निंबाळकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या विविध कमिटीच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली होती. 

आताही केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात रणजितसिंहांचे नाव अचानकपणे पुढे आले आहे. शरद पवारांनी प्रतिनिधीत्व केलेल्या माढ्यात त्यांनी दाखवलेली कमाल, सहानुभूतीचे वातावरण असतानाही पंढरपुरात समाधान औताडे यांना निवडून आणण्यात घेतलेले कष्ट व पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढावी यासाठी रणजितसिंहांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे. 

Back to top button