पंढरपुरात मानाची वासकर दिंडी दाखल | पुढारी

पंढरपुरात मानाची वासकर दिंडी दाखल

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचे महासंकट असल्याने पोलिस प्रशासनाने पायी वारीस बंदी घातली आहे. तरीही सर्व गोष्टींचा सामना करीत गनिमी काव्याने संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाची गुरुवर्य तात्यासाहेब वासकर दिंडी बुधवारी (दि. 7) पंढरीत सात दिवसांत दाखल झाली. यामुळे दिंडीने आपली पायी वारीची परंपरा कायम ठेवली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने आषाढी यात्रा पायी वारीला सलग दुसर्‍या वर्षी परवानगी नाकारली आहे. यात्रा कालावधीत दि. 17 ते 25 जुलै दरम्यान पंढरपूर शहर व परिसरातील 9 गावांत संचारबंदी आहे. मानाच्या पालख्या वगळता इतर दिंड्या, पालख्यांना पंढरीत प्रवेश नाही. पोलीसांनी त्रिस्तरीय नाकाबंदीची तयारी केली आहे. 

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांसह मानाचे 10 पालखी सोहळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही राज्य परिवहन महामंडळाच्या बसने आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला येत आहेत. परंतु पायी वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी वारकर्‍यांनी केली होती. वारकरी प्रतिनिधी व जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर व पांडुरंग महाराज घुले यांनी याबाबत आग्रह धरला होता.  आपल्या निवडक वारकर्‍यांसह त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानानंतर चालायला सुरुवातही केली होती. 

परंतु दिघीजवळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व कराड येथे पोलिसांच्या निगराणीखाली ठेवले. त्यानंतर पोलिसांना हुलकावणी देत दादा महाराज शिरवळकर यांची दिंडी आळंदीतून निघाली. परंतु, दिवे घाटात त्या दिंडीला पोलिसांनी अडविले व अटक केली.

परंतु संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाची गुरुवर्य तात्यासाहेब वासकर दिंडी हातामध्ये टाळ आणि खांद्यावर वीणा घेवून  रामकृष्ण हरी नामाचा जयघोष करीत आज पंढरीत दाखल झाली. आळंदी ते पंढरपूर हे 230 किमीचे अंतर त्यांनी केवळ सात दिवसात पूर्ण केले. संचारबंदी पुर्वीच पंढरीत येवून त्यांनी चंद्रभागेचे स्नान केले. नामदेव पायरीचे व कळसाचे दर्शन घेवून नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.व वारी पूर्ण केली. 

विठ्ठलाच्या कृपेने ही पायी वारी पुर्ण करून घेतली मी धन्य झालो, त्याचा आम्हाला आनंद वाटतो, अशी भावना दिंडीच्या विणेकरी भाविकांनी व्यक्त केली.

 

Back to top button