मुद्रांक थकबाकीबद्दल टोलनाका चालकांना नोटिसा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील 17 टोलनाके चालकांनी जिल्ह्याचा कोट्यवधी रुपयांचा मुद्रांक शुल्क थकविला आहे. याप्रकरणी त्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे मुद्रांक शुल्क विभागाचे उपजिल्हाधिकारी गोंविद गीते यांनी सांगितले. यातील 17 पैकी 12 जणांनी माहितीच दिलेली नाही तर ज्या पाच जणांनी माहिती दिली आहे त्यांच्याकडे 3 कोटी रुपये मुद्रांक शुल्काची थकबाकी असल्याचे ते म्हणाले.

गीते म्हणाले, जिल्ह्यातील विविध महामार्गांचे काम करण्यासाठी विविध कंत्राटदारांनी रस्ते बांधले होते. त्यावर वसुलीसाठी टोलनाके निर्माण केले होते. मात्र, यांचे रितसर शासनाबरोबर करारपत्रक करून त्यापोटीचा मुद्रांक शुल्क विभागाला भरणे अपेक्षित होते. मात्र, जिल्ह्यातील एकाही ठेकेदारांनी हा शुल्क भरलेला नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी जवळपास पाच लोकांनी करारपत्राची माहिती विभागाला कळविली आहे.

ते म्हणाले, त्यामध्ये मेहुल कन्स्ट्रक्शन यांच्याकडे 32 लाख 34 हजार रुपये, बी. वाय. जावडेकर यांच्याकडे 50 लाख 63 हजार रुपये, सोलापूर-पुणे रोड डेव्हलपमेंट कंपनीकडे 66 लाख 99 हजार, तर सुनील रायसोनी अर्थात बिल्डकॉम यांच्याकडे 14 लाख 91 हजार, तर सोलापूर फोरवेज या कंपनीकडे 1 कोटी 91 लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क थकित उघडकीस आले आहे. उर्वरित 12 ठेकेदारांनी अद्याप करापत्रकांची माहिती विभागाला दिलेली नाही.त्यामुळे संबधितांनी तात्काळ ही माहिती मुद्रांक शुल्क विभागाला द्यावी तसेच थकविण्यात आलेला शासनाचा मुद्रांक शुल्क भरावा. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर करावाई करण्यात येईल.

 

Exit mobile version