विठ्ठल मंदिराचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट | पुढारी

विठ्ठल मंदिराचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे मूळ स्वरूपातील सौंदर्य अबाधित ठेवत, मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. याकरिता संपूर्ण विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे प्रथमच स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. 

पुरातत्त्व विभागाचे अधिकारी आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांची गुरुवारी (8 जुलै) येथील नवीन भक्‍त निवासामध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये मंदिराचे मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या संदर्भात येत्या 12  जुलै रोजीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर हे पुरातन आहे. मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. 

ते म्हणाले, बांधकाम कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिराचा ऐतिहासिक ठेवा पुढील अनेक वर्षे जतन करण्यासाठी मंदिर समितीने आवश्यक ती पावले उचलली आहेत. मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी यापूर्वीच पुरातत्व विभागाने अनेक बदल सुचवले आहेत. त्यानुसार मंदिर समितीने मंदिरातील व देवाच्या गाभार्‍यात आवश्यक ते बदल देखील केले आहेत.  संत नामदेव पायरी पासून विठ्ठलाच्या गाभार्‍यापर्यंतच्या मुळ मंदिरामध्ये आवश्यक ते बदल देखील केले जाणार आहेत. यासाठी पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार डीपीआर तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. संत नामदेव पायरीचे देखील सुशोभीकरण केले जाणार आहे. येत्या 12 जुलै रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 

या बैठकीला मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, साधनाताई भोसले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे अधिकारी वाहणे आदी उपस्थित होते.

 

Back to top button