तीबार पेरणीच्या चिंतेने शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या  | पुढारी

तीबार पेरणीच्या चिंतेने शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या 

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा: शेतात दोनवेळा  पेरणी करूनही पावसाअभावी पीक करपल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 

कारखेड (ता. चिखली)येथील शेषराव भगवान मंजूळकार (६०) व जनाबाई शेषराव मंजूळकार (५१) हे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव. त्यांनी आपल्या  जेमतेम दोन एकर शेतावर पहिल्यावेळी केलेली पेरणी वाया गेल्यामुळे  दुस-यांदा पेरणी केली. परंतु पावसाअभावी पीक करपू लागल्याने समोर तीबार पेरणीचे संकट दिसू लागले. त्यामुळे प्रचंड नैराश्य आल्यामुळे या दाम्पत्याने बुधवारी रात्री राहत्या घरात विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान गुरूवारी रात्री पाच तासांच्या अंतराने पती आणि पत्नीचा मृत्यू झाला. 

मृत मंजूळकार दाम्पत्य शेतीसोबतच दगडे फोडून मजूरी करून उदरनिर्वाह करत होते. त्यांना दोन मुले व चार मुली असून सर्व विवाहित आहेत. 

Back to top button