Thu, Oct 01, 2020 18:31होमपेज › Youthworld › चांगल्या गोष्टी शिकवणारा दसरा

चांगल्या गोष्टी शिकवणारा दसरा

Published On: Oct 08 2019 9:51AM | Last Updated: Oct 08 2019 9:51AM
वृषाली पंढरी, वारजे, पुणे

दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर  मिळालेला विजय म्हणजे दसरा. आजच्या युगात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, स्वार्थ, अन्याय, हिंसा आणि क्रौर्य या दहा दुर्गुणांवर विजय मिळविण्याचा संकल्प करणे म्हणजे दसरा, आपल्या प्रत्येक सणात असा काही तरी संदेश दडलेला असतो. भारताच्या इतिहासातच धर्म हा देशाच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. हिंदू धर्मात सणांची रेलचेल असल्याने व देशात हिंदू बहुसंख्येने असल्याने वर्षभर कुठला ना कुठला सण येत असतो. भारतातील धर्म, धार्मिक श्रद्धा आणि प्रथा विविधतेने  नटलेल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षात पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा विशेषतः हिंदूंच्या कशा चुकीच्या आहेत हे पटविण्यात तथाकथित कम्युनिस्ट विचारवंत व काही राजकीय पक्ष हिंदूंमधील जातींच्या उतरंडीमुळे दर्शवत आहेत. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजेला झालेला विरोध हे त्याचे अगदी अलीकडील उदाहरण. उत्सवप्रिय मानल्या जाणा-या आपल्या देशात काही सण असे आहेत की, जे सर्वत्र साजरे होतात. राज्य बदलताच रीत बदलते पण सण मात्र त्याच उत्साहात साजरा होतो. विजयादशमी किंवा दसरा हा असाच एक सण. ‘दुष्टावर सुष्टाचा, वाईटावर चांगल्याचा विजय’ या संकल्पनेतून साजरा होणारा हा सण भारतभर उत्साह जोशात साजरा होतो. 

आपल्याकडे दसरा म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात ती सोन्याचे प्रतीक असलेली आपट्याची पाने. अत्यंत महत्त्वाचा असा कुठलाही उपक्रम सुरू करायलाही दसरा हा उत्तम मुहूर्त मानला जातो. वाहन, गृह किंवा कुठल्याही खरेदीसाठी दस-याचा मुहूर्त साधला जातो. पण हा सण भारतात साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळय़ा आहेत. आपल्याकडे जसं घटस्थापनेला घटात धान्य पेरलं जातं, तसंच काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातीच्या भांड्यात सत्तू पेरतात. दस-याच्या दिवशी त्यातून उगवलेले कोंब ज्याला नोरात्रा किंवा नोरता म्हणतात, ते पुरुषमंडळी त्यांच्या टोपीत खोचतात किंवा कानामागे ठेवतात. कारण हे नोरता शुभलक्षणी मानले जातात. आपल्याकडेही घट उठवताना घटातील गवत कानामागे लावण्याची प्रथा आहे.

जशी देवीची साडेतीन शक्‍तीपीठं आहेत, तसे मुहूर्तही साडेतीन मानण्याची परंपरा आहे. दसरा हा त्यातील एक मोठा मुहूर्त समजला जातो. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो. दसऱ्याला महाराष्ट्रात दोन महत्वाच्या घटनांसाठी एक वेगळे महत्व आहे. या दिवशी राष्टीय स्वयं सेवक संघामार्फत शानदार संचलन केले जाते व सरसंघचालक संघाच्या पुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे दरवर्षी शिवतीर्थावर होणारा शिवसेनेचा मेळावा. या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे काय बोलतात याविषयी तमाम मराठी लोकांनाच नव्हे तर भारतातील राजकीय पक्षांना उत्सुकता लागून राहत असे. उद्धव ठाकरेंनी ती परंपरा कायम ठेवली आहे. मैसूरचा दसराही मैसूर पॅलेसवर केल्या जाणाऱ्या खास झगमगाटासाठी व हत्तींच्या मिरवणुकीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. पूर्वी राजे,विशेषतः छत्रपती व पेशवे युद्धावर जाण्यासाठी विजया दशमीला कूच करीत असत.

या लेखाच्या माध्यमातून दसरा म्हणजेच विजया दशमी साजरा  करण्यामागील काही महत्त्वाची उद्दिष्टे समजून घेऊयात. महाराष्ट्रात विशेषतः खेडेगावात दसरा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पुरुष मंडळी व लहान मोठे तरुण वेशीबाहेर म्हणजे गावाबाहेर जमतात. जातानाच सोनं म्हणजे आपट्याची पाने बरोबर घेतात. तिथे वाजतगाजत रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात येते. नंतर गावात येऊन प्रथम ग्रामदेवताला आपट्याची पाने देऊन नमस्कार केला जातो. बहुतेक सगळे एकमेकांच्या ओळखीचेच असतात. एकमेकांना आपट्याची पाने देऊन आलिंगन दिले जाते. घरोघरी तबकात निरांजन घेऊन महिला, विशेषतः कुमारिका बसलेल्या असतात. सीमोल्लंघन करून आल्यावर पुरुष मंडळींना त्या ओवाळतात व पुरुष त्यांच्या तबकात आपट्याची पाने टाकतात. ओवाळणारी भगिनी त्या बदल्यात विड्याचे पान देते. लहान मुलांमध्ये जास्तीत जास्त पाने जमा करण्याची स्पर्धा लागते. यानिमित्ताने सर्वांचे एकमेकांच्या घरी जाणे होते. अबोला,वाद असतील तर ते विसरले जाते. आपट्याची पाने लहानांनी मोठ्यांना देऊन नमस्कार करण्याची प्रथा आहे. 

१. स्वतःसमवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा, सामर्थ्य दाखविणारा हा सण आहे.

दसरा हा देवीचा सण आहे. देवी ही शक्ती देवता आहे. दशमीच्या दिवशी शमीचे अन् शांततेचे पूजन करायचे असते. हे शांततेचे पूजन आपल्या गावाच्या शिवेबाहेर जाऊन करायची प्रथा होती. ‘’गावाप्रमाणेच गावाबाहेरही शांतता राखून जिकडे तिकडे सुखसमृद्धी आणू’’, असा यामागचा अर्थ आहे. बाहेर सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्रे, अस्त्रे, सैन्यदले इत्यादींचे प्रदर्शन करायचे असते आणि शत्रू असेल, तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी या दिवशी निघायचे असते ही पूर्वीची पद्धत होती. शत्रूचे पारिपत्य करून शांतता प्रस्थापित केल्यानंतर आनंदाप्रीत्यर्थ सर्वांना सोने वाटावयाचे असते. 

२. त्रेतायुगापासून साजरा केला जाणारा विजयादशमी हा पुरातन उत्सव आहे.

‘आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. या दिवशी रामाचा पूर्वज रघुराजाने विश्वजित यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान करून नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्साने १४ कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या म्हणून  रघुराजाने कुबेरावर आक्रमण करण्याची तयारी केली. युद्ध टाळण्यासाठी आपटा आणि शमी या वृक्षांवर कुबेराने सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. कौत्स केवळ १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतो. बाकीच्या सुवर्णमुद्रा प्रजाजनांना वाटण्यात येतात. त्या काळापासून हिंदु लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात. राजकारण हे प्रजेच्या हितासाठी असून स्वतःचे खिसे भरण्यासाठी नसतं हा संदेश राजकारण्यांना देणारा हा दिवस आहे.

३. तमोगुण आणि वाईट शक्ती यांचा नाश होऊन व परस्परांवरील प्रेम जागृत होऊन सृजनतेचे कार्य होणे.

‘देवीतत्त्व कार्यरत असल्यास सगुण स्तरावर तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य होत असते अन् केवळ विष्णुतत्त्व कार्यरत असल्यास निर्गुण स्तरावर तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य होत असते, असे शास्त्र आहे. दसर्‍याच्या दिवशी तारक देवीतत्त्व विष्णुतत्त्वाच्या समवेत एकत्रितपणे कार्यरत होते. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र आल्याने जसे नवनिर्मिती होते तसे या दोन भिन्न तत्त्वांनी संयुक्तपणे कार्य केल्यामुळे तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य संपन्न होण्याबरोबरच या दोन तत्त्वांमधील परस्परांविषयीची प्रीती जागृत होऊन त्यांच्यातील तत्त्वाकडून विनाशाचे कार्य करण्याबरोबरच सृजनतेचे कार्यही आपोआप होऊ लागते. देवी आणि विष्णु यांच्या संयुक्त कार्यरत तत्त्वांकडून प्रक्षेपित होणार्‍या प्रीतीयुक्त कल्याणकारी स्थितीजन्य लहरी संपूर्ण ब्रह्मांडात पसरतात. यामुळे सृजनतेच्या कार्याला गती प्राप्त होते. त्यामुळे पीक चांगले येणे, भरभराट होणे शेतकरी आनंदित होणे यांसारखे परिणाम दिसून येतात. स्थितीजन्य कार्य करण्यासाठी श्रीविष्णूची सहयोगिनी म्हणून श्रीलक्ष्मी त्याच्याबरोबर कार्य करते. त्यामुळे श्रीविष्णु त्याच्या प्रत्येक अवतारामध्ये श्रीलक्ष्मीचाही सहभाग करून घेतो आणि दोघेही मानवदेह धारण करून पृथ्वीतलावर एकाच वेळी अवतार घेतात.

४. श्रीराम आणि हनुमान तत्त्वे अन् क्षात्रवृत्ती एकाच वेळी जागृत करणारा दसरा

दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रिकीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. या क्षात्रभावातून आपल्याला ईश्वरी राज्याची स्थापना करावयाची आहे. दसर्‍याला श्रीराम आणि हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्ती निर्माण होऊन श्रीरामाचे तारक, म्हणजेच आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास साहाय्य होते.

दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल (शक्तीरूपी) आणि तांबूस रंगांच्या स्प्रिंगसारख्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे जिवाची आत्मशक्ती जागृत होण्यास साहाय्य होऊन जिवाच्या मारक भावाबरोबरच नेतृत्वगुणामध्येही वाढ होते. यामुळे जिवात क्षात्रभावाचे संवर्धन होते. जिवाने आपल्यामध्ये क्षात्रगुणाचे संवर्धन केल्यानेच तो सहज दुर्जनरूपी शक्तींचा संहार करू शकतो. म्हणूनच या दिवशी युद्धासाठी बाहेर पडत असत, सीमोल्लंघन करीत असत व विजयी होत असत.पत्नीला महत्व देण्याचा संदेश या रुढीतून दिला गेला आहे.

जगभरातील दसरा...

 दसरा हा सण संपूर्ण भारतासह अन्य देशांमध्येही मोठ्या हर्षोउल्हासात साजरा होतो. भारतासह इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, चीन आणि थायलंडमधेही दसरा साजरा केला जातो. नेपाळमध्ये तर विजयादशमी हा वर्षभरातील सर्वात मोठा सण आहे. नेपाळमधील गुरखे काली माता आणि दुर्गा मातेची नऊ दिवस पूजा करतात. विजयादशमीच्या दिवशी राज दरबारात राजा आपल्या प्रजेला अबीर, तांदूळ आणि दह्याचा टीळा लावतो.  नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मॉरीशसमध्ये हिंदूं हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.