Wed, Jun 23, 2021 02:20
दोन वर्षांनी मिळणार हजारो वर्षे जिवंत राहण्याचा मार्ग ?

Last Updated: Jun 09 2021 8:56PM

वॉशिंग्टन ः दीर्घायुष्यी होण्यासाठी बहुतांश माणसांची धडपड सुरू असते. त्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात असतात. आता हार्वर्ड विद्यापीठातील एका प्राध्यापकाने दावा केला आहे की माणूस हजारो वर्षे जिवंत राहू शकतो. त्यासाठीचा उपाय केवळ दोन वर्षांमध्येच माणसाला गवसू शकतो. प्रा. डेव्हिड सिंसलॅर यांनी म्हटले आहे की उंदरांवर केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध झाले आहे की मेंदू आणि अन्य अवयवांमधील वाढत्या वयाचे काटे उलट दिशेने फिरवता येतात!

सिंसलॅर यांनी एका पॉडकॉस्टमध्ये म्हटले की आम्हाला संशोधनात असे दिसून आले आहे की एक भ्रूण किंवा मूलभूत जनुक असते जे प्रौढ पशूंच्या शरीरात समाविष्ट केले तर वयाशी निगडीत असलेल्या ऊती पुन्हा तयार होऊ शकतात. हे जनुक उत्तमप्रकारे काम करण्यासाठी चार ते आठ आठवड्यांचा कालावधी घेते. वयोमानामुळे द‍ृष्टी गमावलेल्या एका उंदराला यासाठी प्रयोगात घेतले जाऊ शकते. त्याच्या मेंदूतील चेतापेशी काम करीत नसल्याने असे घडते. जर या चेतापेशींना पुन्हा बनवले गेले तर हा उंदीर पुन्हा तरुण बनू शकतो तसेच पाहू शकतो. 52 वर्षांच्या सिंसलॅर यांनी सांगितले की गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच माझे एक संशोधन प्रकाशित झाले होते. त्यामध्ये सिद्ध करण्यात आले आहे की एक अशी व्यवस्था आहे जिच्या सहाय्याने पेशींना पुन्हा तारुण्यावस्थेत नेले जाऊ शकते. ‘एम्ब—ॉयनिक जीन्स’ म्हणजेच ‘भ—ूण जनुकां’चा वापर आम्ही सध्या अशा उंदरांच्या मेंदूतील वयावर करीत आहोत ज्यांना आम्ही वेळेपूर्वीच म्हातारे केले होते आणि ते आता पुन्हा आपली क्षमता मिळवत आहे. येत्या दोन वर्षांपेक्षाही कमी काळातच या तंत्राचे मानवावर संशोधन सुरू होईल अशी आम्हाला आशा आहे.