होमपेज › Vishwasanchar › तब्बल सात फूट उंचीची कोथिंबीर!

तब्बल सात फूट उंचीची कोथिंबीर!

Last Updated: Jun 27 2020 10:13PM
डेहराडून : कोथिंबिरीची जुडी विकत घेतल्याशिवाय आपली मंडईतील फेरी पूर्ण होत नाही. वीतभर लांबीची कोथिंबीर जेवणात स्वाद वाढवण्याचे काम करीत असते. मात्र, कधी आपल्यापेक्षाही अधिक उंचीची कोथिंबीर असू शकते याची तुम्ही कल्पना केली आहे का? उत्तराखंडमधील पर्वतीय भागात एका शेतकर्‍याने जैविक पद्धतीने कोथिंबीरचे उत्पादन घेतले असून ही कोथिंबीर तब्बल 7.1 फूट उंचीची आहे!

गोपाल उप्रेती या शेतकर्‍याने या कोथिंबिरीचे उत्पादन घेतले आहे. तिची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्येही करण्यात आली आहे. यापूर्वी सर्वात उंच कोथिंबीर म्हणून 1.8 मीटर म्हणजेच 5.11 फूट उंचीच्या रोपाची नोंद गिनिज बुकमध्ये होती. हा विक्रम या 2.16 मीटर म्हणजेच 7.1 फूट उंचीच्या कोथिंबिरीने मोडला आहे. बिल्‍लेख रानीखेत अल्मोडाच्या ‘जी.एस. ऑर्गेनिक अ‍ॅपल फार्म’मध्ये गोपाल यांनी जैविक पद्धतीने कोथिंबिरीचे शेत पिकवले आहे. त्यामध्ये पॉलीहाऊसचा वापर करण्यात आलेला नाही. तिथे अनेक कोथिंबिरीची रोपे सात फुटांपर्यंत वाढलेली आहेत. आम्ही परंपरागत पद्धतीने शेती करतो आणि जैविक खाद्यच पिकांना देतो असे गोपाल यांनी सांगितले. विशेषतः शेणखतामुळे पिकांची वाढ चांगली होते असे त्यांनी म्हटले आहे.