Wed, Jun 23, 2021 02:24
सेना - भाजपने अडीच वर्षाचा मुख्यमंत्री प्रस्ताव मान्य करावा : रामदास आठवले

Last Updated: Jun 11 2021 5:54PM

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सेना - भाजपने अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव मान्य करावा असे आवाहन केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नेते रामदास आठवले यांनी केले आहे. नागपुरात शुक्रवारी( दि ११) घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी सेना भाजप एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखविली. 

ते म्हणाले की,  'शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी झाली नसती. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विरोधात जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अजूनही भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करावे.' 

'उध्दव ठाकरे यांना राज्यात मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन दिड वर्ष पूर्ण होत आले आहे. आणखी एक वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पदावर राहावे आणि पुढची अडीच वर्ष भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसू द्यावे.' असेही आठवले म्हणाले. 

सेना भाजप ने मुख्यमंत्री पदाचा अडीच अडीच वर्षाचा कालावधी वाटून घ्यावा या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून त्यांना हा प्रस्ताव मान्य असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.