Wed, Oct 28, 2020 10:49होमपेज › Vidarbha › खड्डेमुक्‍त रस्ते अभियान यशस्वी : चंद्रकांत पाटील

खड्डेमुक्‍त रस्ते अभियान यशस्वी : चंद्रकांत पाटील

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 16 2017 2:04AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

प्रमुख राज्यमार्ग, राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे 15 डिसेंबरपर्यंत बुजविणात येणार असल्याचे सांगितले होते. यासाठी मंत्रालयात वॉररूमही सुरू केली होती. या मोहिमेला यश आले असून प्रमुख राज्यमार्ग व राज्य मार्गावरील 97.25 टक्के, तर प्रमुख जिल्हा मार्गावरील 82.84 टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित कामे वेगाने सुरू असून लवकर सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली. काही मार्गावर जर खड्डे आढळले तर नागरिकांनी कळवावे, ते खड्डे तातडीने बुजविण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 89 हजार 190 कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यामध्ये 6 हजार 163 कि.मी.चे प्रमुख राज्यमार्ग, 30 हजार 970 कि.मी.चे राज्यमार्ग आणि 52 हजार 057 कि.मी.चे लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. 15 डिसेंबरच्या दुपारपर्यंत यातील प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे पडलेल्या 23  हजार 381 कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी 22 हजार 736 कि.मी. (97.25 टक्के) लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. तर उर्वरित रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. 17 जिल्ह्यातील खड्डे शंभर टक्के बुजविण्यात आले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी टिकाऊ डांबरीकरण आणि रोड कोटिंग करण्यात आले.

जिल्हा परिषदांकडून वर्ग झालेले रस्ते हे ‘रोहयो’अंतर्गत तयार केलेले असल्यामुळे तसेच त्यांची अवस्था खूपच खराब असल्यामुळे या रस्त्यांची कामे नव्याने करावी लागणार आहेत. त्यासाठीची 
प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पाटील म्हणाले की, राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांची कामे पूर्ण करण्यासाठी 30 जिल्ह्यांमध्ये रस्ते मार्गावरून दौरा केला आहे.  प्रत्येक जिल्ह्यातील अभियंत्यांची बैठक घेतली आहे. प्रत्येक कामाची माहिती ऑनलाईन साईटवर टाकण्यात येत होती. खड्डे असलेले रस्ते, ते बुजविण्यात आल्यानंतरचे खड्डे आदींची माहिती फोटोसह या ठिकाणी मिळत होती.