यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
विजयी उमेदवाराने दिलेल्या पार्टीत ‘तू जेवणाला का आलास’ असे म्हणत एकाने जेवण करताना समोरच्याला धारदार सूरी फेकून मारली. यात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. २०) सायंकाळी ही घटना दिग्रस तालुक्यातील राहटी येथे घडली. कोंडबा लक्ष्मण हटकर (वय ३६) असे मृत युवकाचे नाव असून विश्वास संदीप गव्हाणे (वय २५) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, दिग्रस तालुक्यातील राहटी येथील एका शेतात विजयी उमेदवाराने जेवणाचा कार्यक्रम आयोजित होता. या कार्यक्रमात हे दोघेही जेवणासाठी समोरासमोर बसले होते. जेवण करीत असताना ‘तू जेवणाला येथे का आला’ या कारणावरून वाद निर्माण झाला. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले. तेवढ्यात विश्वास संदीप गव्हाणे याने कोंबडी कापण्यासाठी आणलेली धारधार सूरी कोंडबा हटकर याला फेकून मारली. ती सूरी थेट कोंडबाच्या छातीत घुसली.
त्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच कोंडबा हटकरला दुचाकीवरुन दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंह बिलवाल आदींनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. प्रदीप सुखदेव पवार (वय ३२, रा.पंचाळा, ता.मानोरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी विश्वास गव्हाणे विरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली आहे.