Tue, Sep 29, 2020 18:32होमपेज › Vidarbha › नागपूर : सत्ता परिवर्तनाच्या तयारीला लागा

नागपूर : सत्ता परिवर्तनाच्या तयारीला लागा

Published On: Dec 13 2017 2:01AM | Last Updated: Dec 13 2017 2:01AM

बुकमार्क करा

नागपूर : चंदन शिरवाळे

राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीला भाजप सरकारकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करीत, सत्तांतरानंतर तीन वर्षांनी एकत्र आलेल्या विरोधी पक्षांनी केंद्र व राज्य सरकारवर घणाघाती आरोप केले. सर्वसामान्य जनता, शेतकरी,  कष्टकरीविरोधी हे सरकार असून, जनतेने 2019 मध्ये होणार्‍या सत्तांतराच्या तयारीला लागावे, असे आवाहन विरोधी पक्षांनी संयुक्‍तपणे केले. नागपुरात मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चात विरोधी पक्षांच्या सर्वच नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बळीराजाला संकटातून बाहेर  काढण्यासाठी सरकारवर हल्लाबोल करावा लागत असल्याबाबत खंत व्यक्‍त केली. ते म्हणाले,  शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर सरकारने झोपेचे सोंग घेतले असल्यामुळे आता सरकारला मुळापासून उपटून टाकण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सरकार शेतकर्‍यांना केवळ थापा मारण्याचे काम करीत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर दीड हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत, तरीही सरकारला पाझर फुटला नाही. त्यामुळे सरकारच काही देत नाही, तर तुम्हीसुद्धा सरकारला सोसायटीचे कर्ज, पाणी आणि वीज बिल देऊ नका.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल पदयात्रेवर टीका केली होती. हल्लाबोल करणार्‍यांनी गेल्या पंधरा वर्षांत सत्तेत असताना कुठे-कुठे डल्ला मारला याची आपल्याकडे माहिती आहे, तिचा आपण लवकरच सभागृहात भांडाफोड करू, असा इशारा दिला होता. तो संदर्भ पकडून पवार यांनी, दमदाटी करून राज्य चालत नाही. तुम्ही जर असेच वागला, तर तुम्हालाही उखडून टाकायची ताकद बळीराजामध्ये आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला. काँग्रेस नेत्यांवर पाकिस्तानी अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेचाही पवार यांनी समाचार घेतला.

सरकारची खोटी आश्‍वासने : आझाद

काँग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकच विचारधारा असल्याचे सांगितले. ते म्हणाले,  देशाच्या प्रगतीसाठी आम्ही लढत आहोत, तर खोटे बोलून सत्ता मिळविलेल्या भाजपकडून शेतकरी व जनतेच्या हिताची कामे केली जात नसल्यामुळे हल्लाबोल आणि जनआक्रोश करावा लागत आहे. खोटी आश्‍वासने देत सरकार दिवस काढत आहे. भाजपच्या वॉर्ड किंवा जिल्हा अध्यक्षांनी खोटी आश्‍वासने दिली असती, तर आम्ही विसरलो असतो; पण पंतप्रधानपदावरील व्यक्‍ती खोटे बोलत आहे, असा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला.

पंतप्रधानांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना खोटी आश्‍वासने देऊन देशाचा अपमान केला आहे. नोटाबंदीमध्ये शेकडो लोकांना हकनाक बळी जावे लागले. त्यामुळे हा जनआक्रोश केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता जनकल्याण साधण्यासाठी झाला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

लाभार्थी जाहिरातीची खिल्ली

विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्य सरकारच्या मी लाभार्थी या जाहिरातबाजीची खिल्ली उडविली. ते म्हणाले, जाहिरातबाजीवर सरकारने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. परंतु, शेतकर्‍यांची अजूनही कर्जमाफी केली नाही. आपला हक्‍क मागणार्‍या शेतकर्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा लावणारे हे सरकार आता बदला, असे आवाहन विखे यांनी केले.

3 वर्षांत 15 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या

विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तीन वर्षांत राज्यात 15 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, कर्जमाफीचा निर्णय होऊनही दीड हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप केला.

ज्या महाराष्ट्राने भाजपला तीन वर्षांपूर्वी डोक्यावर घेतले, तीच जनता या पक्षाच्या सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा होईपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देऊ नका, असे आवाहन केले.  स्टॅम्प पेपरवर लिहून देणार्‍यांना अजून शेतकर्‍यांच्या खात्यांत कर्जमाफीची रक्‍कम जमा केली नाही, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला.

सर्वत्र अघोषित आणीबाणी : चव्हाण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी समाजातील सर्व घटकांत सरकारच्या धोरणांमुळे असंतोष निर्माण झाला असल्याचे सांगितले. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. शरद पवार आणि राहुल गांधी या दिग्गज नेत्यांच्या जोरावर आपण 2019 ला सत्तेवर येणार आहोत. समाजातील प्रत्येक घटकावर हे सरकार दबाव टाकत असून, सर्वत्र अघोषित आणीबाणी लादली आहे. त्यामुळे यावर मात करायची असेल, तर परिवर्तन केलेच पाहिजे, अशी भावना चव्हाण यांनी व्यक्‍त केली.

पांढरी टोपी विरुद्ध काळी टोपी असा संघर्ष

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. ते म्हणाले, ही लढाई शेतकर्‍यांची पांढरी टोपी विरुद्ध काळी टोपी यामध्ये सुरू आहे. देशात धार्मिक तेढ वाढवण्याचे काम नागपूरमधून होत आहे. ही केवळ आजची लढाई नाही, तर भावी पिढीच्या भवितव्यासाठी आपल्याला लढावे लागणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्‍ल पटेल यांनी जनआक्रोश मोर्चाला मिळालेला प्रतिसाद व दोन्ही काँग्रेसची ताकद बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली असेल, अशा शब्दांत टीका केली. यावेळी हल्लाबोल पदयात्रा यशस्वी केल्याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.