Sat, Aug 08, 2020 12:32होमपेज › Vidarbha › वर्धा : ‘महावितरण’च्या आणखी ५ कर्मचा-यांना कोरोनाची लागण

वर्धा : ‘महावितरण’च्या आणखी ५ कर्मचा-यांना कोरोनाची लागण

Last Updated: Jul 05 2020 9:35AM
नागपूर : पुढारी ऑनलाईन 
 
चक्रीवादळामुळे कोकणात खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करून परत आलेले वीज वितरण विभागाचे आणखी पाच कर्मचारी आज (दि. ५) कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. यात हिंगणघात येथील ५५ वर्षीय पुरुष, २९ व ३० वर्षीय तरुणाचा अशा तिघांचा समावेश आहे. तर दोन जण (वय ५० पु. व ४० पु.) देवळी तालुक्यातील आहेत, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ही अशी माहिती दिली. 

कोकणात चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी २० कर्मचारी वर्धा जिल्ह्यातून गेले होते. परतल्यानंतर त्यातील ३ कर्माचा-यांना काल (दि. ४) कोरोना झाल्याचे समोर आले. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. यात आज (दि. ५) प्राप्त १२ अहवालात  ५ व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्या आहेत. तर दोन नेगेटिव्ह आणि पाच अहवाल इनकनक्लुसिव्ह आहेत. यामध्ये तीन कर्मचारी हिंगणघाटमधील आहेत. एक पुलगाव आणि एक विजयगोपाल येथील आहे. 

हिंगणघाटमधील बाधित कर्मचाऱ्यांना सेवाग्राम रुग्णालयात तर देवळी मधील रुग्णांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. या रुग्णांसहित जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २७  झाली आहे. त्यातील १२ कोरोनामुक्त तर १४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. एकाचा पूर्वीच मृत्यू झाला आहे.