Mon, Apr 12, 2021 03:15




चंद्रपुरात कोरोनाचा उद्रेक; ९ मृत्यू तर ६६८ पॉझिटिव्ह 

Last Updated: Apr 08 2021 8:37PM





चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा 

चंद्रपुरात दरदिवशी कारोना बाधित आणि मृत्यूचा आकडा वाढत आहे. कालचा कोरोनाचा मृत्यूचा आकडा आज गुरूवारी दुप्पटीने वाढला आहे. चंद्रपुरातही कारोनाचा उद्रेक होताना दिसतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील २४ तासात ६६८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून नऊ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर २१८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  दैनंदिन वाढणारा  बाधितांचा आणि मृत्यूचा आकडा  जिल्हा प्रशासनासाठी चिंतेची बाब असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी पाऊले उचलली जात आहे.  

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३१ हजार 1१६८ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २६ हजार ९१८ झाली आहे. सध्या ३७९४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ९१ हजार ८५३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ५६ हजार २०३ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये वणी येथील ३६ वर्षीय पुरुष, शेगाव वरोरा येथील ४० वर्षीय पुरुष, रामदेव बाबा मंदिर, वरोरा येथील ८० वर्षीय महिला, नागभीड येथील ६७ वर्षीय महिला, भेमदाडा, राजुरा येथील ५२ वर्ष महिला, रामपूर राजुरा येथील ५२ वर्षीय पुरुष, चिमूर येथील ५० वर्षे महिला, वरोरा शहरातील  ६० वर्षीय पुरूष व ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत ४५६ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ४१३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २०, यवतमाळ १९, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या ६६८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील १७५, चंद्रपूर तालुका ५०,  बल्लारपूर ३६, भद्रावती ३७, ब्रम्हपुरी २१, नागभिड ३१, सिंदेवाही नऊ, मूल ३७, सावली २३, पोंभुर्णा एक,  गोंडपिपरी दोन, राजूरा २५, चिमूर ३९, वरोरा १३३, कोरपना ३७, जीवती दोन व इतर ठिकाणच्या १० रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हजणे चंद्रपूर महानगर पालिका, वरोरा आणि भद्रावती येथे बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणी नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करावे याकरिता जिल्हा प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.