Wed, Jun 23, 2021 00:48
नववधू १५ तोळे सोन्यासह दुसऱ्याच दिवशी पसार; दुसऱ्याशी लग्न करताना पोलिसांच्या बेड्या

Last Updated: May 21 2021 7:05PM

जळगाव: पुढारी ऑनलाईन 

पैसे घेऊन लग्न ठरवले. झोकात सोहळा झाला. नववधू लाजत मुरडत नांदायला आली. मुलाचं न होणारं लग्नही जुळून आलं म्हणून घरचे खूश होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी नववधू अंगावरचे १५ तोळे सोने घेऊन पसार झाली आणि लग्नघरच हादरलं. मात्र, पळून गेलेली नववधू दुसऱ्या घरची लक्ष्मी बनायला  जात असतानाच  पोलिसाच्या तावडीत सापडली. 

वाचा: घरच्यांचा प्रेमाला विरोध; अल्पवयीन प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर तालुक्यातील मारवाड पोलिसांच्या सतर्कतेने नववधू, तिची मावशी आणि मामाला जेरबंद करण्यात यश आले आहे. या टोळीतील आणखी काहीजण पसार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सोनू राजू शिंदे (रा. सिद्धार्थनगर, हिंगोली) , तिची मावशी पूजा प्रताप साळवे  (रा. सिद्धार्थनगर, हिंगोली)  मामा योगेश संजय साठे (रा. शिवसेना नगर, ता. अकोला) यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासह एक चारचाकी वाहन जप्त केले. यावेळी मुलीची आई आणि भाऊ पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सोनूचा विवाह सहा मे रोजी  शहादा तालुक्यातील मंदाणे येथील भूषण संतोष सैंदाणे याच्याशी झाला. १५ मे रोजी लग्न झाल्यानंतर सोनू १६ मे रोजी पसार झाली. लग्न झाल्याच्या आनंदात असलेल्या घरातील सदस्यांना घटनेमुळे एकच धक्का बसला.  त्यानंतर तातडीने भूषण याने शहादा पोलिस स्टेशनमध्ये सोनू हरवल्याची फिर्याद दिली.  याचा तपास हेड कॉन्स्टेबल दीपक परदेशी आणि विश्वास साळुंखे करीत होते. 

वाचा : डॅडी अन् जुबेदाचं प्रेम प्रकरण माहीत आहे का?

सोनू ही पसार झाल्यानंतर मारवाड येथे गेली होती. तेथील कपिलेश्वर मंदिरात तीन दुसरे लग्न करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे  मारवड पोलिस स्टेशनचे एपीआय राहुल फुला ,हेड कॉन्स्टेबल बबलू होळकर , अनिल राठोड व होमगार्ड चारुदत्त पाटील यांनी तेथे छापा टाकला मात्र, पोलिसांचा सुगावा लागताच सोनूसह तिचा मामा आणि मावशी ही शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता तेथून ते पडावद येथे गेले.  ही माहिती एपीआय राहुल फुला यांनी तातडीने नरडाणा पोलिसांना दिली आणि पथकाला पाचाराण केले. तेथे पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. 

पडावद येथे सोनू ही प्रवीण शिवाजी पाटील यांच्या मेहुण्याशी लग्न करणार होती. पण तत्पुर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. संशयितांना नरडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांना शहादा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहेत.

वाचा : सांगली : कोरोना रुग्णाने माहिती लपवल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू