Mon, Apr 12, 2021 03:59
नागपुरात पाचव्या दिवशी लक्षणीय वाढ, बाधितांचा आकडा १ हजारांच्या वर

Last Updated: Feb 25 2021 7:38PM

नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, आणि वाशिम या पाच जिल्ह्यानंतर आता नागपुरातही कोरोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ सुरू झाली आहे. गुरूवारी (दि २५) आलेल्या अहवालात सलग पाचव्या दिवशी नागपुरात एक हजाराहून अधिक कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तब्बल पाच महिन्यांच्या अवकाशानंतर गुरूवारी नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा १ हजार ११५ कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

अधिक वाचा : भ्रष्टाचार हा सरकारी यंत्रणेचा अविभाज्य भाग : पोलिस महासंचालक हेमंत नागराळे

दरम्यान गुरूवारी नागपूर जिल्ह्यात हा आकडा १ हजार ११५ वर गेला. तर कोरोनामुळे १३ नवे मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे, रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर प्रशासनाने चार दिवसांपूर्वीच अनेक कठोर निर्बंध जारी कोले होते. त्यानंतरही रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 

अधिक वाचा : संजय राठोडांचे पोहरादेवीतील शक्तीप्रदर्शन भोवले; महंतांसह ८ जण कोरोना पॉझिटिव्ह!

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढ ही मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यात झाली होती. सप्टेंबरमधील अनेक दिवस रुग्णवाढ ही एक हजाराच्या पुढेच होती. या काळात मृत्यूचे प्रमाणही अधिक होते. मात्र, त्यानंतर यात घट होत संख्या शंभरीच्या घरात आली होती. त्यामुळे प्रादुर्भाव कमी होईल, असे वाटत असताना शहरात गेल्या काही दिवसांपासून पाचशे ते सातशेच्या घरातच करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.

प्रशासनाकडून चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. मंगळवारी ११ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्यानंतर गुरूवारीही जवळपास १० हजार ६११ चाचण्या करण्यात आल्या. यात शहरात ८२६ रुग्ण, तर ग्रामीणमध्ये २८८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. दिवसभरात करोनामुळे तेरा मृत्यू नोंदवण्यात आले. यात ९ मृत्यू हे शहरातील, २ ग्रामीण भागातील आणि दोन जिल्ह्याबाहेरील होते.