Fri, Aug 14, 2020 17:29होमपेज › Vidarbha › शिवसेनेला भाजपची उपसभापतिपदाची ऑफर

शिवसेनेला भाजपची उपसभापतिपदाची ऑफर

Published On: Jul 04 2018 2:23AM | Last Updated: Jul 04 2018 1:28AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

अकरा जागांच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेतील चित्र बदलणार असून, शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी विधान परिषदेचे उपसभापतिपद त्यांना देण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. 
विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती माणिकराव ठाकरे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत या महिन्यात संपत असून, 16 जुलै रोजी होणार्‍या विधान परिषद निवडणुकीनंतर सभागृहात भाजप-शिवसेनेच्या वाढणार्‍या संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेचा उपसभापती करण्याचे भाजपने ठरवले आहे. या प्रस्तावावर शिवसेना काय निर्णय घेते, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 16 जुलैला नागपूरमध्ये निवडणूक होत आहे. विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ लक्षात घेता भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन सदस्य निवडून जाणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. शिवसेनेने अतिरिक्‍त मतांच्या बळावर तिसरा उमेदवार दिलाच, तर 11 व्या जागेसाठी शिवसेना, काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात लढत होईल. 

मात्र, या निवडणुकीनंतर विधान परिषद सभागृहातील समीकरण बदलणार आहे. विधान परिषदेत भाजप हा पाहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो. या संख्याबळावर भाजपकडून उपसभापतिपदावर दावा करण्यात येणार आहे. माणिकराव ठाकरे यांची मुदत संपत असल्याने उपसभापतिपदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात होणार आहे.