Sat, Feb 27, 2021 06:52
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण ः संजय राठोड यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पोहरावदेवीच्या परिसरात हजर; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Last Updated: Feb 23 2021 1:41PM

यवतमाळ ः पुढारी वृत्तसेवा 

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्ररकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं चर्चेत आलेलं नाव होतं. त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. त्यात राठोड हेदखील मागील १५ दिवसांपासून माध्यमांसमोर आले नव्हते की, कोणतंही स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे विरोधानी त्यांच्यावरील शंका आणखीच गडद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ते पोहरादेवीच्या दर्शनाला कुटुंबासह येऊन देवीचं दर्शन घेतले. त्यांच्या समर्थनासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. त्यांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलिसांकडून लाठीचार्जही केलेला आहे. 

वाचा ः परळी ते पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणचा अवघा दोन आठवड्यांचा प्रवास

कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत हे समर्थक पोहरादेवी मंदीर परिसरात जमलेले दिसत आहेत. आज सकाळपासून संजय राठोड यांच्या समर्थनार्थासाठी शक्तीप्रदर्शन हे समर्थक करत आहेत. या प्रकरणावर पूजा चव्हाणची चुलत आजी म्हणाली की, "संजय राठोड यांनी खोटे बोलून समाजाची दिशाभूल करू नये. पोहरादेवी गडावर आपल्या कृत्याची कबुली द्यावी", असे आजी शांताबाई राठोड यांनी म्हटले आहे. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. लोक अशाप्रकारे समर्थन करत असतील तर लोकशाहीसाठी घातक असल्याचे दरेकरांनी सांगितले. 

वाचा ः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : तांड्यावरील युवतीचे पंख छाटले कोणी? 

यापूर्वीच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता चौकशीची मागणी करणारं पत्र पोलीस महासंचालकांना दिलं आहे. "पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समाजमाध्यमांमध्ये ध्वनिफितीसुद्धा फिरत आहेत. त्यामुळे बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थता असून याप्रकरणी सखोल चौकशी करावी", अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवून केली आहे. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

कोरोनाच्या नियमांचा फज्जा
राठोड पोहरादेवीला आल्यानंतर  राज्यावर घोंघावणाऱ्या करोना संकटाचा त्यांच्या समर्थकांना विसर पडला. राठोड शिवसेनेचे असूनही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनालाही त्यांच्या समर्थकांनी हरताळ फासला. राठोड येणार असल्याने पोहरादेवी परिसरातील प्रचंड गर्दी केली होती. घोषणाबाजी करून शक्तिप्रदर्शन केले.  “कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला” अशा घोषणाही दिल्या जात आहेत.